नवी दिल्ली : भारतासह जगभारत सध्या कँसर (Cancer) आणि हृदयविकाराचे (Heart attack) रुग्ण वाढत आहेत. तरुणपणीही हृदयविराराच्या झटक्याने निधन झालेले अनेक व्यक्तींच्या कहाण्या आपण ऐकत असतो. तर कँसरसारख्या आजारानं एकदा शरीरात, घरात प्रवेश केला की ते माणसाला किती खिळखिळं करून टाकतं, याचीही अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. हे दोन महत्त्वाचे आजार वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठं आव्हान आहेत. अनेक वर्षांपासून यावर संशोधन सुरु आहे. या संशोधनातूनच एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. कँसर तसेत हृदय विकार होऊ नये, यासाठी लवकरच बाजारात लस येऊ शकते. अमेरिकी तज्ञांनी हा दावा केलाय. अमेरिकेतील एका प्रमुख फार्मास्युटिकल फर्मने ही लस कधी येईल, हेसुद्धा सांगितलंय..
द गार्डियनच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. कँसर आणि हृदय विकारावरील ही लस पाच वर्षात बाजारात येऊ शकते. 2030 पर्यंत सर्व प्रकारच्या कसोट्या या लसीद्वारे पार केल्या जातील असा दावा, मॉडर्ना या औषध कंपनीने केलाय. कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉल बर्टन यांनी सांगितलं की, ‘सर्व प्रकारच्या आजारांसाठी’ अशा प्रकराची उपचार पद्धती आम्ही कमीत कमी पाच वर्षात लोकांसमोर आणू..
कोरोना विषाणूवरही याच मॉडर्ना कंपनीने लस तयार केली होती. आता विविध प्रकारचे ट्यूमर तयार करणाऱ्या कँसरवरही लवकरच लस तयार होतेय. जगभरातील लोकांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्यूमर आढळतात, त्यांच्याविरोधात ही लस प्रभावी काम करेल, असा विश्वास पॉल बर्टन यांनी व्यक्त केलाय.
आरएसव्ही अर्थात रेस्पिरेटरी सिन्सिटिय व्हायरस (RSV) विरोधातदेखील ही लस प्रभावीपणे काम करेल. तसेच सध्या ज्या आजारांवर काही उपचार होत नाहीत, अशा दुर्धर आजारांसाठीदेखील ही लस प्रभावी ठरेल. जी प्रथिनं एखाद्या आजाराविरोधात शरीरात प्रतिकार करतात, अशी प्रथिनं पेशींद्वारे बनवण्याचे काम या लसीच्या माध्यमातून शरीरात केले जाईल.
बर्टन यांनी आणखी एक सकारात्मक बाब सांगितली. ती म्हणजे येत्या काही वर्षात आपल्याकडे अत्यंत दुर्धर आजारांसाठीदेखील एमआरएनए आधारीत उपचार पद्धती असतील. यापूर्वी त्या अस्तित्वात नव्हत्या. म्हणजेच येत्या 10वर्षानंतर आपण एका नव्या जगात प्रवेश करणार. जिथे तुम्हाला एखादा आजार आनुवंशिक पद्धतीने होणार असल्याचा अंदाज आधीच वर्तवला जाईल. गेल्या दोन अडीच वर्षात कोरोना महामारीमुळे वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रचंड गुंतवणुकीमुळे संशोधनाचा वेगही जोमात आहे. पण गुंतवणुकीचा प्रवाह असाच सुरु राहिला तरच संशोधनात प्रगती होईल, अन्यथा यासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी चिंताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.