नवी दिल्ली – असंसर्गजन्य आजारांमध्ये हृदयविकाराची प्रकरणे वाढत आहेत. कमी वयात लोकांना हृदयविकाराचा झटका (Heart attack) येतो. यामुळे जागीच मृत्यूही होत आहे. खराब जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि कोविड व्हायरस ही हृदयविकार वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. मात्र, केवळ काही लोकांनाच हे माहीत असेल तरी शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता (Vitamin D deficiency) असणे हेही हृदयविकार (heart disease) वाढण्याचे एक कारण आहे.
देशभरात 30 ते 40 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन-डीची कमतरता आढळते. नऊ महिने ऊन असूनही लोकांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, लोक सूर्यापासून स्वतःचे रक्षण करतात आणि शहरी जीवनशैलीत तर लोकांच्या जीवनात सूर्यप्रकाश फारच कमी असतो. यामुळेच लोकांमध्ये व्हिटॅमिन-डीची कमतरता दिसून येत आहे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. मात्र यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढत आहे.
व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबाचा धोका
आरोग्यतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कमी सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते, हे देखील हृदयविकाराचे एक कारण आहे. क्रॉस-सेक्शनल अभ्यास करण्यात आले, त्यानुसार व्हिटॅमिन डीची कमतरता असणे हे हाय ब्लड प्रेशर, हार्ट फेल्युअर आणि इस्केमिक हृदयरोगासह CVD च्या वाढत्या जोखमीशी संबंधित आहे. व्हिटॅमिन डीची पातळी कमी असेल तर हृदयविकाराचा धोका 60 टक्क्यांपर्यंत वाढतो. तसेच व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात हाय ब्लड प्रेशरची समस्याही वाढते, ज्याचा थेट हृदयाच्या विकारांशी संबंध असतो. अशा परिस्थितीत लोकांना सूर्यप्रकाशाचे जास्त सेवन करण्याचा किंवा सूर्यप्रकाश जास्त वेळ अंगावर घेण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होत नाही. यामुळे तुमचे हृदय तर स्वस्थ राहतेच पण हाडंही मजबूत होतात.
या आहारातून मिळते व्हिटॅमिन-डी
सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त आहारातूनही व्हिटॅमिन-डी मिळते. त्यासाठी लाल मांस, अंडी, पनीर यांचे सेवन करता येते. या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जर शरीरात एकदा व्हिटॅमिन-डी ची कमतरता निर्माण झाली तर औषधे किंवा इंजेक्शनच्या सहाय्यानेच त्याची पातळी वाढवता येऊ शकते. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे आपली हाडं आणि स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे आरोग्यासंदर्भातील अनेक आजार होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीमध्ये आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तसेच दिवसभरात कमीत कमी15 मिनिटे तरी उन्हात बसावे किंवा सूर्यप्रकाश अंगावर घ्यावा.