विरुद्ध जीवनशैलीमुळे वजन वाढणे ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमधेच ही समस्या पाहायला मिळत आहे. यावर उपाय जर बरेच असले तरी फायदा मात्र फारसा होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी (Weight loss) जिम, योगा, झुंबा करण्यासाठी जातात. पण, तरी देखील ही समस्या काही दूर होत नाही. विशेष म्हणजे वजन वाढल्याचे हे पोट आणि कंबर (Bally Fat) वाढलेले दिसते. आणि हेच वाढलेले पोट काही सहजासहजी कमी होत नाही. गंभीर बाब म्हणजे या वाढत्या लठ्ठपणामुळे (Overweight) अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो. लठ्ठपणामुळे हृदयविकार (Heart Attack), मधुमेह, उच्च रक्तदाब (High blood pressure) आणि थायरॉईडचे आजार होतात. त्यामुळे यावर योग्यवेळी उपाय करणे फार गरजेचे असते.
बऱ्याचदा वाढलेल्या वजनाला आपणही कारणीभूत असतो. अयोग्य आहार, जंकफूडचे अति सेवन, आळस, तणाव आणि व्यायाम या गोष्टीमुळे वजन वाढण्याची समस्या जाणवते. तुम्ही जर तुमच्या जीवनशैलीत काही बदल केले नाही तर तुम्हाला या त्रासाला सामोरे जावे लागते. जर तुम्हला तुमचे वजन कमी करायचे असेल तर योग्य उपाय करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला डाएट किंवा इतर कोणत्याही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही छोटे पण महत्त्वाचे बदल करण्याची गरज आहे. ते बदल केल्यास तुम्हाला फायदा होईल. चला तर जाणून घेऊया हे कोणते बदल आहेत.
वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. व्यायाम केल्याने शरीरातील चरबी बर्न होते. व्यायामामध्ये तुम्ही चालणे, धावणे आणि पोहणे यासारखे व्यायाम करू शकता. या व्यायामामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल. 15-30 मिनिटांचा नियमित व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रोबायोटिक फूडचे सेवन करावे. प्रोबायोटिकमध्ये लोणचे, चटण्या, दही यांचा समावेश होतो. परंतु, हे सर्व पदार्थ घरी बनवलेले असावे. या पदार्थांमधील चांगले बॅक्टेरिया तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात आणि तुम्हाला हेल्दी ठेवतात.
बऱ्याचदा आपण पाहतो हंगाम बदला की, बाजारात भाज्या आणि त्यानुसार फळे येण्यास सुरुवात होते. त्यामुळे हंगामात येणाऱ्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे. हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. हंगामी भाज्यांमध्ये आपल्या आरोग्याला आवश्यक असणारे पोषक तत्त्वे असतात. यामुळे त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो. पालेभाज्या, कोबी यांसारख्या काही भाज्या आपल्याला लोह, फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिनने समृद्ध असतात. त्यामुळे या भाज्यांचे सेवन करावे.
जेवणानंतर मधल्या वेळेत आरोग्यदायी नाश्ता तुमची सायंकाळची भूक कमी करू शकतो. नाश्तामध्ये पोषक तत्वांचे सेवन केल्याने तुमचे पोट भरलेले राहते. नाश्त्यात काय खावे याचे आधीच नियोजन करा. प्रथिने आणि फायबर असलेल्या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा. नाश्त्यात तुम्ही फळे आणि ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. हे पदार्थ तुमच्या शरीराला ऊर्जा देतील. तसेच वजन नियंत्रित ठेवतील. तसेच तुम्ही नाश्तामध्ये रताळे, शेंगदाणे किंवा हर्बल चहा घेऊ शकता.