नवी दिल्ली – 2011 साली स्पेनमध्ये 10 मुलींनी ही घोषणा केली होती की त्यांच्यापैकी प्रत्येत मुलगी ही स्वत:शीच (marriage to self) लग्न करत आहे. मजेमजेत सुरू झालेल्या या प्रकाराने सर्वांसाठी धक्कादायक होतं खरं, कारण ती पारंपारिक वैवाहिक जीवनाविरुद्ध (married life) एका बंडाची घोषणा होती. मात्र प्रत्यक्षात त्या मुलींना (त्यातून) असं काही सापडलं, ज्याची मोहीम जगभरात आधीच सुरु झाली होती, त्याचं नाव आहे ‘सोलोगॅमी’ (solo gamy).. सोलेगॅमी म्हणजे नक्की काय, हे जाणून घेऊया.
पारंपारिक पद्धताीने विवाह किंवा लग्न करणं हे आता प्रत्येक तरूणीच्या जीवनातील महत्वाचे उद्दिष्ट राहिलेले नाही. तर ‘सोलोगॅमी’ वर विश्वास असणाऱ्या या तरूणी इतरांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करण्याची इच्छा व्यक्त करतात. पण स्व-प्रेम किंवा आत्म-प्रेम व्यक्त करण्याचा हा मार्ग खूप विचित्र की एक नवा आणि आश्चर्यकारक (मार्ग) आहे ?
माय ही महिला 11वर्षांपासून विवाहीत असून खुश आहे. तिने स्वत:शीच लग्न केले आहे. तिचा जोडीदार इतर कोणी नाही तर ती स्वत:च आहे. आपल्या लग्नबंधनाचे नूतनीकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात बोलताना तिने सांगितलं की, लग्नाच्या निमित्ताने मी असा संकल्प केला आहे की, मी माझा आतला आवाज ऐकेन आणि मला काय हवे आहे ते दररोज स्वतःला विचारेन, जेणेकरून मी (माझ्या इच्छा) पूर्ण करू शकेन. त्यांचा हा अप्रोच इतर महिलांना फारच भावला कारण मायाचे भाषण पूर्ण होताच तिथे टाळ्यांचा कडकडाट झाला.
सोलोगॅमी म्हणजे काय ?
‘सोलोगॅमी’ हा शब्द तुम्ही (यापूर्वी) कधी ऐकला असेल याची शक्यता फारच कमी आहे. हा शब्द (सोलोगॅमी) अधिकृतपणे स्पेनमधील भाषेचा भाग नव्हे, पण या शब्दाची उत्पत्ती तेथूनच झाली आहे. स्वत:शीच लग्न करण्याची ही प्रथा किंवा पद्धत, जपान, अमेरिका, भारत, इटली आणि ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये रूढ होत आहे.
स्पेनमधील माय यांनी 2011 साला पासून 70 महिलांना तिच्या (स्वत:शी लग्न करण्याच्या) पावलावर पाऊल ठेवण्यास मदत केली आहे. पण बहुतेक देशांमध्ये स्व-विवाहाचा कायदा अद्याप अस्तित्वात नाहीये? मग तरीही अजून इतक्या स्त्रिया ते का करत आहेत ?
माय सीरानो म्हणतात की, मी तर हे (स्वतःशी लग्न) मजे-मजेत केलं होतं. रोमँटिक प्रेमावर सामान्य चर्चा सुरू करणे, हाच माझा लग्नाच्या दिवसापर्यंत एकच हेतू होता. “पण माझ्या लग्नाच्या दिवशी, मला समजलं की आपण काहीतरी महत्त्वाचे करणार आहोत. मला वाटले की मी स्वतःवर प्रेम करते, मी माझी चांगली मैत्रिण आहे आणि त्याच क्षणी मी शेकडो लोकांसमोर स्वत:लाच वचन दिले की, मी स्वतःची काळजी घेईन आणि आधी स्वतःचा विचार करेन” असे माय यांनी नमूद केले.
लैंगिक संबंधाच्या तज्ज्ञ असणाऱ्या नेविस ट्रबजोसा यांच्या सांगण्यानुसार लिंगभावाचा दृष्टिकोन सोडून प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिकरित्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे महत्वाचे आहे. पुरुषांना स्वतःला महत्त्व द्यायला शिकवले जाते, मग महिलांसाठी त्यांचे व्यक्तिमत्व अडथळा का ठरावे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महिलांना असं वाटतं की स्वत:वर प्रेम करणं महत्वाचं नाही
मानसशास्त्रज्ञ एस्प्रांका बॉश फॅविल म्हणतात की स्वतःवर प्रेम करणे शिकणे हे अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्यामुळे आपल्याला जगात आपले स्थान निश्चित करण्यात मदत होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या प्रेमासाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही हेही आपल्याला ठरवता येतं.
आपण कोणावर आणि कसे प्रेम करतो याचा ट्रेंड बदलत आहे. स्पेनमध्ये अजूनही बहुसंख्य जोडपी पारंपारिक वैवाहिक संबंधात बांधली गेली आहेत, परंतु आकडेवारीवर नजर टाकल्यास एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे आता पूर्वीपेक्षा कमी विवाह होत आहेत पण दुसरीकडे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.
पण दोनदा लग्न केलेल्या जिंकलसारख्या महिलांची केस वेगळी असते. त्यांनी पहिले लग्न केले ते एका पुरुषाशी आणि दुसरं लग्न केलं ते स्वत:शीच. ‘माझ्या
धाकट्या मुलीचा जन्म झाल्यानंतर मला अचानक जाणवलं की माझ्या आयुष्यात मला स्वत:साठी वेळ आणि जागाच नाही, त्यामुळेच
मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला’, असं जिंकल यांनी सांगितलं. मी जिंकल नव्हते, मी केवळ पेरू आणि मॅरिन यांची आई बनले होते, असे त्यांनी नमूद केले.
जिंकेलचा नवरा सर्गिव्ह सांगतात, की “जेव्हा तिने (जिंकल) स्वत:शी लग्न करण्याचा तिचा निर्णय जाहीर केला, तेव्हा सुरुवातीला मला विचित्र वाटलं आणि मी आश्चर्यचकित झालो होतो. पण जर ती स्वत:वर प्रेम करत नसेल आणि ती स्वत:बद्दल समाधानी नसेल, तर त्याचा माझ्यावर, आमच्या मुलांवर आणि तिच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येकावर परिणाम होईल’, हे लक्षात आल्याचेही सर्गिव्ह यांनी नमूद केले.
नेव्हिस ट्रबजोसा सांगतात की, एक काळ असा होता की एखाद्या महिलेला बँक खाते उघडण्यासाठी आणि कार चालविण्यास सक्षम होण्यासाठी चर्चमध्ये लग्न करावे लागे. पण गेल्या काही दशकांत बरेच बदल झाले आहेत. असे असूनही, पारंपारिक कुटुंब हा समाजाचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे जो नैसर्गिक मानला जातो.”
एस्प्रांका बॉश फॅविल सांगतात की मोठ्या प्रमाणात पारंपारिक विवाह स्त्रीसाठी तुरुंगाप्रमाणे असतो. याचं पहिलं कारण म्हणजे आपल्याला आयुष्यभर सांगितले जाते की लग्न करणे हा आपल्या जीवनाचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. आकडेवारीवरून असे सिद्ध होते की लग्नानंतर, घरातील कामं, मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची काळजी घेणे ही महिलांची जबाबदारी आहे. ”
स्पॅनिश सरकारच्या आकडेवारीनुसार, 2010 मध्ये, महिलांनी पुरुषांपेक्षा घरकामात दोन तास अधिक घालवले.
सोलोगॅमीमुळे या आकड्यात बदल होईल का ?
सोलोगॅमी हा यासमस्येवरचा उपाय नाही तर ते पितृसत्ताक समाजाचे प्रतीक आहे, असे नेविस ट्रबजोसा सांगतात.
बदल होतोय
300 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, 2018 साली रॉयल स्पॅनिश अकादमीने समान अनुभव आणि प्राधान्ये असलेल्या महिलांसाठी एक शब्द सादर केला, तो शब्द म्हणजे ‘सोरोरेटी’.
माय सांगतात, आपण स्त्रिया जेव्हा एका जागी जमा होतो, तेव्हा असं वाटतं की आपण आरशासमोर उभ्या आहोत. स्त्रिया एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत ही कल्पना पितृसत्ताक समाजाची निर्मिती आहे, त्यांची इच्छा आहे की आपण एकत्र येऊ नये. पण प्रत्यक्षात याच्या अगदी उलट आहे. जेव्हा आपण (महिला) एकत्र असतो तेव्हा आपण अधिक मजबूत असतो, असे माय यांनी नमूद केले. हे एक असे आव्हान आहे जे आपल्याला स्वतःवर प्रेम करायला सांगते. आपण इतरांवर प्रेम करण्यापेक्षा स्वतःवर जास्त प्रेम केले पाहिजे, असेही माय यांनी सांगितले.
काहीवेळा असे करणे कठीण असते कारण लोक समजून घेत नाहीत आणि आपल्यावर स्वार्थी असल्याचा आरोप करतात, असे जिंकल यांनी सांगितले. पण वस्तुस्थिती अशी आहे की स्वतःशी लग्न केल्यानंतर माझे पती आणि मुलांसोबतचे नाते सुधारले आहे, असेही जिंकल यांनी नमूद केले.