नवी दिल्ली – जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. अनेक वेळा आपले शरीर स्वतःच अनेक रोगांचे संकेत देते पण, जर आपल्याला त्याची माहिती नसेल, तर आपण हे संकेत समजू शकत नाही. इतर अवयवांप्रमाणेच आपली नखंही (nails) अनेक आजारांचे संकेत देतात. आपल्या नखांवर असणारे पांढरे डाग किंवा रेषा (white spots on nails) हेही गंभीर आजाराचे संकेत देतात. बऱ्याच लोकांच्या नखांवर पांढरे डाग किंवा रेषा असतात, ते कॅल्शिअमच्या (calcium) कमतरतेचे लक्षण आहे, असे मानले जाते. पण हे खरं नाही. हे डाग कसले असतात, याचं खरं कारण नुकतच समोर आलं आहे.
नखांवर पांढरे डाग फक्त कॅल्शियमच्या कमतरतेमुळेच नव्हे तर झिंक अथवा जस्ताच्या कमतरतेमुळेही होतात. याबद्दल आहारतज्ज्ञांनी नुकताचा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, झिंक हे अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे ज्याची शरीराला गरज असते. आपले शरीर झिंक तयार करत नाही किंवा अन्नपदार्थातून मिळणारे झिंक ते साठवू शकत नाही, त्यामुळेच झिंकयुक्त पदार्थांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, लोहानंतर झिंक हा दुसरा घटक आहे, जो शरीरात मुबलक प्रमाणात आढळतो. पेशींची वाढ, प्रथिने उत्पादन, डीएनए आणि रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी झिंक आवश्यक असते. त्याच्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.
झिंकच्या कमतरतेची लक्षणे
शरीरात झिंकची कमतरता आहे की नाही, हे ओळखणे कठीण असते कारण झिंक हे रक्तामार्फत छोट्या पेशींमध्ये विरघळलेले असते. त्यामुळे रक्ताची चाचणी केली तरी झिंकची कमतरता ओळखता येईलच असे नाही. पण शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांच्या माध्यमातून झिंकची कमतरता आहे, हे समजू शकते.
– पुरेशी झोप न येणे
– प्रतिकारशक्ती कमकुवत होणे
– वजन वाढणे
– दात किडणे आणि हिरड्यांमधून रक्त येणे.
– हातावर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या
– वास आणि चव कमी होणे
– अतिसाराचा त्रास
– त्वचेवर जखमा
– भूक न लागणे,
– सामान्य पातळीपेक्षा जास्त केस गळणे
– नखांवर पांढरे डाग
झिंकची कमतरता असेल तर हे पदार्थ खावेत
शरीरात झिंकची कमतरता निर्माण झाल्यास मांसाहारच्या माध्यमातून ती भरून काढता येते. तुम्ही शाकाहारी असाल तर खाली नमूद करण्यात आलेले पदार्थ सेवन करून झिंकची कमतरता दूर करता येऊ शकते.
– शेंगदाणे
– मशरूम्स
– तीळ खावेत
– अंडं
– दही
– लसूण
– राजमा
– दलिया
– कॉर्नफ्लेक्स
झिंकचे अतिसेवन घातक
झिंकचे अतीसेवन हे शरीरासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे मळमळ, उलटी, अतिसार व पोटदुखी होऊ शकते. प्रौढ व्यक्तींमध्ये झिंकचे 40 मिलिग्रॅमहून अधिक सेवन हे नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे ताप, खोकला , थकवा व डोकेदुखीसारखा त्रास होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झिंक सप्लीमेंट्सचे सेवन करू नये.