नवी दिल्ली – बऱ्याच लोकांना असं वाटतं की थोड्या प्रमाणात मद्य प्यायल्याने शरीराचे काही नुकसान होत नाही, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (world health organization) सांगण्यानुसार, थोडे-थोडे मद्यपान (alcohol) केल्यानेही शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. WHO नुसार, दारूमध्ये कोणताही असा प्रकार नाही की ज्यामुळे शरीराचे नुकसान होत नाही. द लॅन्सेट जर्नलमध्ये WHOने असे नमूद केले आहे की दारू प्यायल्याने अथवा मद्यपान केल्याने सात प्रकारच्या कॅन्सरचा (cancer) धोका वाढतो.
डॉक्टर कॅरिना फरेरा यांनी सांगितले की दारूच्या प्रमाणाबद्दल अनेक संशोधनं झाली. पण दारूच्या सेवनाचे कोणते प्रमाण योग्य आहे, याबाबत कोणीही अद्याप दावा करू शकलेले नाही. दारूमुळे तोंड, पोट, ब्रेस्ट (कॅन्सर) आणि कोलनच्या कॅन्सरचा धोका कितीतरी अधिक वाढतो.
काय सांगते संशोधन ?
यासंदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासा असे सांगण्यात आले आहे की मद्यपान केल्यामुळे 7 प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. दारू प्यायल्यामुळे तोंडाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, इसॉफॅगस कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो.
ब्रँडने काही फरक पडत नाही
जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, दारू किती महाग आहे आणि ती कोणत्या ब्रँडची आहे याने काही फरक पडत नाही. कोणत्याही स्वरूपात दारूचे सेवन हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. अगदी कमी प्रमाणात काय, दारूचा अगदी एक थेंब देखील आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. अल्कोहोलचे जितके जास्त सेवन केले जाईल तितका शरीरातील रोगांचा धोका वाढेल. दारूमुळे यकृताव्यतिरिक्त, मूत्रपिंड आणि आतड्यांचे देखील नुकसान होते. जे लोक स्वस्त दारू पितात त्यांना मृत्यूचा आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अल्कोहोलची थोडीशी मात्रा देखील स्लो पॉयझन म्हणून कार्य करते. त्यामुळे निरोगी व्यक्तीला अनेक आजार होऊ शकतात.
कॅन्सरसह 200 आजारांचा धोका
या संशोधनात असे म्हटले आहे की तंबाखू आणि सिगारेटप्रमाणेच अल्कोहोलमुळे देखील कॅन्सर होतो, परंतु लोकांना हे माहित नसते. अल्कोहोलमुळे, कोलन कॅन्सरची प्रकरणे वाढू शकतात. यामुळे सुमारे 200 आजार होऊ शकतात. अल्कोहोलमुळे रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते, त्यामुळे टीबीचा धोका उद्भवतो.
गर्भवती महिलेने दारूचे सेवन केले तर त्याचा परिणाम तिच्या बाळावरही होतो. पण जगभरात दारूचे सेवन करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत आजारांचा धोकाही वाढत आहे. तंबाखू उत्पादनांप्रमाणेच, अल्कोहोलवर देखील कॅन्सरचा इशारा दिला पाहिजे, असा सल्ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनने दिला आहे.