मुंबई : पोलिओ लसीकरणाबाबत (Polio vaccination) आता तज्ज्ञांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिओ हा हवेतून (air) पसरतो, त्यामुळे तोंडाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीपेक्षा इंजेक्शनद्वारे (injection) दिलेली लस अधिक परिणामकारक ठरते असे 25 वर्षांपूर्वी पल्स पोलिओ मोहीम राबविणारे तज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांनी म्हटले आहे. देशात इंजेक्शनच्या माध्यमातून लसीकरण वाढवण्याची आवश्यकता असल्याचे देखील ते म्हणाले. द लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात बुधवारी डॉ. टी जेकब जॉन आणि मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. धन्या धर्मापालन यांची मुलाखत छापण्यात आली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलिओ व्हायरसचा प्रसार हा अधिक प्रमाणात हवेच्या मार्गाने होतो. त्यामुळे पोलिओला प्रतिबंध घालण्यासाठी तोंडाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीपेक्षा इंजेक्शनच्या माध्यमातून देणारी लस अधिक परिणामकारकर ठरते. पूर्वी जे गरिब देश होते त्या देशांत पोलिओचे रुग्ण अधिक आढळत, मात्र आता जगभरातून पोलिओ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. भारतात पाच वर्षांच्या आतील मुलांना तोंडाद्वारे पोलिओचा डोस देण्यात येतो. मात्र त्यापेक्षा तो इंजेक्शनच्या माध्यमातून दिला गेला तर तो अधिक परिणामकारक ठरू शकतो असे डॉ. टी जेकब जॉन यांनी म्हटले आहे.
पोलिओ मोहिमेबाबत माहिती देताना डॉ. धन्या धर्मापालन यांनी म्हटले आहे की, पोलिओचा संसर्ग हा लहान मुलांना अधिक असतो. सरासरी वय 15 महिन्यांच्या आतील बालकांना तसेच जे बालकं स्तनपान करतात त्यांना पोलिओचा धोका अधिक असतो. त्यामुळे पाच वर्षांच्या आतील मुलांना पोलिओचा डोस देणे आवश्यक आहे. भारतात पोलिओ आजाराचे निर्मूलन झाले आहे. मात्र बालकांना वेळेच्यावेळी पोलिओ लस देणे महत्त्वाचे असल्याचे धर्मापालन या म्हणाल्या आहेत.
एकूण तीन प्रकारच्या पोलिओ विषाणूमुळे पोलिओ होतो. याचा सर्वाधिक धोका हा बालकांना असतो. पोलिओचे विषाणू हे मध्यवर्ती चेतासस्थेवर परिणाम करतात. पोलिओ हा प्रौढ व्यक्तीला देखील होऊ शकतो. मात्र त्याचा धोका हा सर्वात जास्त लहान मुलांना असतो. दाट लोकवस्ती, निकृष्ट राहणीमान अस्वच्छता अशा वातावरणात पोलिओ सहज पसरतो. लहान मुलांप्रमाणेच वृद्ध, गरोदर महिला, प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती आणि नुकत्याच टॅन्सिल काढून टाकलेल्या व्यक्तीलाही पोलिओचा धोका अधिक असतो.