देशभरासह महाराष्ट्रातही अनेक भागांत हळूहळू थंडीचं आगमन झालं असून पारा चांगलाच उतरला आहे. थंडीमुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरल्याचंही दिसून येत आहे. थंडी सुरू झाली की अनेक लोक उत्साहात व्यायाम करण्यास सुरूवात करतात, काहीजण जिम लावतात, तर काही लोक जॉगिंग करण्यास सुरूवात करतात. काही जण सकाळी तर काही लोक रात्री पळायला जातात. पण शरीराला सवय नसताना, थंडीच्या दिवसात अचानक असा व्यायाम सुरू करणं हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. थंडीत असा अचानक व्यायाम सुरू केल्यास हार्ट ॲटक अर्थात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. थंडीच्या दिवसात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सर्वाधिक असून हृदयरोगी तसेच वृद्ध नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक
थंडीत हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं इंटर्व्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. नितीन रेड्डी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे थंडीत हृदयरोगी आणि वृद्धांनी जास्त काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. थंडीच्या दिवसात शरीर गरम ठेवण्यासाठी आपल्या रक्तवाहिन्या या आकुंचन पावतात. अशावेळी आपले हृदयाचे ठोके वाढतात आणि ब्लडप्रेशर वाढून हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असतो, अशी माहितीदेखील डॉक्टरांनी दिली आहे.
थंडीच्या दिवसांत वातावरणात गारवा असतो, अशावेी अनेक लोक उत्साहात येऊन नव्यानं जिम लावतात, जॉगिंग सुरू करतात. मात्र अशा लोकांच्या शरीराला व्यायामाची सवय नसते, पण अचानक व्यायाम सुरू केल्यानं हृदयाचे ठोके वाढून हार्ट अटॅक येऊ शकतो, अशी भीती डॉक्टर रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.
कोणी घ्यावी विशेष काळजी ?
त्यामुळे ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे अशांनी तसेच वृद्ध नागरिकांनी थंडीच्या दिवसांत जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केलं. तसेच बाहेर पडताना पुरेसे गरम कपडे घातल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका,असा सल्लाही डॉक्टर नितीन रेड्डी यांनी दिला. इतकंच नव्हे, तर थंडीत अति गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो, असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळं थंडीत आपण काहीतरी अचाट साहस करायला जात असाल, तर वेळीच सावध व्हा आणि जीव वाचवा.