मुंबई : कर्करोग (Cancer) हा एक गंभीर आजार आहे ज्यामुळे जगभरात लाखो मृत्यू होतात. WHO च्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये कॅन्सरमुळे सुमारे 90 लाख मृत्यू झाले. हे शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. अलीकडील अहवालानुसार, कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 77 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या आजाराबाबत लोकांना अधिकाधिक जागरूक करण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस आज रविवारी येत आहे. जाणून घेऊया, जागतिक कर्करोग दिनाचे महत्त्व, थीम आणि इतिहास काय आहे.
जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लोकांमध्ये या जीवघेण्या आजाराबाबत जनजागृती व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. या दिवशी लोकांना कॅन्सरविषयी माहिती देणे, त्याची लक्षणे ओळखणे, त्यावर लवकरात लवकर उपचार करून घेणे आणि प्रतिबंध करण्याचे उपाय केले जातात. जर लोकांना या आजाराशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असेल, तर या आजारापासून बचाव करण्यात मोठी मदत होऊ शकते.
दरवर्षी जागतिक कर्करोग दिनासाठी एक थीम निवडली जाते. या वर्षीची थीम आहे “क्लोज द केअस गॅप: एवरीवन डिजर्व्स एक्सेस टू कैंसर केयर”. या थीमच्या मदतीने कर्करोगाच्या सर्व रुग्णांना सहज उपचार घेण्याची संधी मिळावी यावर भर देण्यात आला आहे. मागासलेले देश आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांतील रुग्णांना कॅन्सरचे चांगले उपचार मिळू शकत नाहीत. त्यामुळे ही दरी भरून काढण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. त्याची उप-थीम आहे, “टूगेदर वी चॅलेंज इन पॉवर”. या उप-थीमच्या मदतीने, कर्करोग दूर करण्यासाठी संसाधने प्रदान करण्यासाठी नेत्यांच्या जबाबदारीवर भर देण्यात आला आहे.
जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास फार जुना नाही. सन 1999 मध्ये, पॅरिसमधील कॅन्सर विरुद्धच्या जागतिक शिखर परिषदेत हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर 2000 साली 4 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश हा आहे की, जगातील सर्व देशांनी मिळून कर्करोगाशी लढा द्यावा आणि या प्राणघातक आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी आपले पूर्ण सहकार्य करावे. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट या आजाराशी संबंधित संशोधन आणि काळजीला चालना देणे हे आहे.