जगभरात तबला वादनाला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि जगाला शास्त्रीय संगीताकडे खेचून आणणारे प्रसिद्ध तबलावादक, उस्ताद झाकिर हुसैन यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं. रविवारी अमेरिकेच्या सेन फ्रान्सिस्को येथे त्यांनी अखरेचा शेवटचा श्वास घेतला. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित गंभीर आजार होता. त्याशिवाय त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होत होता, त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच ढासळली. उपचारांसाठी काही काळ ते रुग्णालयात दाखल होते मात्र रविवारी रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. आयुष्याच्या संध्याकाळी उस्ताद झाकिर हुसैन यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागला. त्यांना नेमका काय त्रास होता ? जाणून घेऊया.
पीटीआयने यासंदर्भात बातमी दिली आहे. झाकिर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आजाराची माहिती दिली आहे. झाकिर हुसैन यांना ‘इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’ नावाचा फुफ्फुसाचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक कॉम्प्लिकेशन निर्माण झाले होते. या आजाराशी सामना करत असतानाच अखेर,वयाच्या 73 व्या वर्षी झाकिर हुसेन यांची प्राणज्योत मालवली. हृदयाच्या धमन्यांची गती मंदवाल्यामुळे त्यांच्या शरीरात स्टेंट बसवण्यात आले होते अशी माहितीही समोर आली होती.
झाकिर हुसैन यांच्याबाबतीत काय घडलं ?
उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर हृदय कमजोर होतं. त्यामुळे हृदयात रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. अशावेळी हार्ट फेल होण्याची, हार्ट अटॅक येण्याचा अथवा स्ट्रोकचा अधिक धोका असतो. उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केलं तर हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढतो. हाय ब्लड प्रेशरमुळे नसांवर अधिक दबाव येतो. त्यामुळे नसा आकुंचन पावतात, परिणामी रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. अशावेळी ऑपरेशन करून हृदयात स्टेंट टाकावी लागते.
बीपी असलेल्या रुग्णांचं आयुष्य किती ?
एका अभ्यासानुसार, हाय बीपी अर्थात उच्च रक्तदाब असलेले लोक हे नॉर्मल ब्लड प्रेशर असलेल्या लोकांच्या तुलनेत कमी काळ जगतात. त्यांचं आयुर्मान 5.1 वर्षाने कमी होतं. तर उच्च रक्तदाब असलेल्या महिलांचं आयुर्मान 4.9 वर्षाने कमी होतं. त्यामुळेच बीपीचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने पाहून वेळीच औषधोपचार केले पाहिजेत.
इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (IPF) म्हणजे काय ?
झाकिर हुसेन यांना इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे. या आजारात श्वास घेण्यास त्रास होतो. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसाच्या छोट्या छोट्या हवेच्या पिशवीतून जात रक्तात मिसळतो. तिथून शरीरातील प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. पण इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (IPF) झाल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो. एखाद्या व्यक्तीचं वय अधिक असेल तर समस्या अजून वाढते. फुफ्फुसातून रक्तात येणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीराचे इतर भागही नीट कार्य करू शकत नाहीत.
लक्षणे आणि उपचार
या आजारावर कोणताच उपचार नाही. हा आजार फक्त नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो. परिस्थिती गंभीर झाल्यावर लंग ट्रान्स्प्लांट करण्याचा एकमेव पर्याय असतो. हळूहळू फुफ्फुस वाढतं आणि कडक होतं. त्यामुळे फुफ्फुसावर जखमा झाल्यासारखं होतं. त्यामुळे छातीत दुखू लागतं. छाती घट्ट आवळल्यासारखी होते, पायाला सूज येते, भूक कमी लागते. घसा खवखवत राहतो, थकवा जाणवू लागतो. जॉईंटमध्ये वेदना होतात. अंग दुखू लागतं. वजन कमी होतं. श्वसनाचा त्रास होतो, अशी लक्षणे दिसू लागतात. यासह एखादा दुसरा एखादा आजार झाला असेल तर अजून समस्या निर्माण होऊ शकतात.