ढाका : बांगलादेशात( Bangladesh) भयानक दुर्घटना घडली आहे. एक प्रवासी बोट नदीत बुडाली आहे. या घटनेत 24 जणांचा पाण्यात पुडून मृत्यू झाला आहे. या घटनेत बरेच जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. सर्व जण दुर्गा पुजेसाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे.
बांगलादेशातील उत्तरेकडील पंचगड जिल्ह्यातील करतोया नदीत ही दुर्घटना घडली. रविवारी बोट उलटल्याने 24 जण बुडाले आहेत तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
बोडा उपजिल्ह्यातील मारिया युनियन कौन्सिल अंतर्गत येणाऱ्या औलियार घाट परिसरात ही बोट दुर्घटना घडली आहे. बोडा, पंचपीर, मारिया आणि बांगरी भागातील हिंदू समाजाचे लोक महालयाच्या मुहूर्तावर दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी औलिया घाटातून बडेश्वर मंदिराकडे जात असताना ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगीतले.
बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. भार न पेलवल्याने नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर बोट उलटली. ज्यांना पोहता येत होते ते पोहत पोहत किनाऱ्यावर आल्याने त्यांचा जीव वाचला.
बोटी प्रवाशांनी खचाखच भरली होती. यामुळे 24 जण बुडाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु आहे.
बांगलादेशातील लाखो लोक राजधानी ढाका किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी बोटी आणि फेरीवर अवलंबून आहेत. मात्र, 95% पेक्षा जास्त बोटी सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत.