काबूल : अफगाणिस्तानची (Afganistan) राजधानी काबूलमधील (Kabul) मशिदीत बुधवारी झालेल्या स्फोटात (Bomb blast) किमान 16 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मृतांच्या आकड्यांमध्ये वेगवेगळ्या माहितीनुसार तफावत दिसून येत आहे. मजार-ए-शरीफ शहरातील तीन मिनीबसमध्ये हा स्फोट झाला. बाल्ख प्रांतांच्या पोलीस ठाण्याचे प्रवक्ते आसिफ वजीरी यांनी सांगितले की, शहरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तीन मिनीबसवर बॉम्ब ठेवण्यात आले होते. या स्फोटात अन्य पंधरा जण जखमी झाले आहेत. बाल्ख आरोग्य विभागाचे प्रमुख नजीबुल्ला तवाना यांनी सांगितले की, वाहन स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा राजधानी काबूलमधील एका मशिदीत आणखी एक बॉम्बस्फोट झाला. यामध्ये किमान दोन लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. त्याचवेळी काबूलमधील एका रुग्णालयाने ट्विट केले की, मशिदीत झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. यामुळे मृतांच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचं दिसून येतंय.
काबूलमधील मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमींना बाहेर काढण्यासाठी रुग्णवाहिका मशिदीपर्यंत पोहोचल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मशिदीतील पंख्याच्या आत बॉम्ब ठेवण्यात आला होता. बुधवारी झालेल्या चार बॉम्ब स्पोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही.
गेल्या महिन्यात 29 एप्रिलला काबूलमधील सुन्नी मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 10 लोकांचा मृत्यू झाला होता. येथे मोठ्या संख्येनं अल्पसंख्याक सुफी समाजाचे लोक उपस्थित होते. जे नमाज पठण करण्यासाठी जमले होते. 21 एप्रिलला मझार-ए-शरीफमधील शिया मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 12 उपासक ठार आणि अनेक जण जखमी झाले. रमजान दरम्यान सर्वात प्राणघातक हल्ला उत्तरेकडील कुंदुझ शहरात झाला तेव्हा 22 एप्रिलला मशिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवून सुफी उपासकांना लक्ष्य केलं गेलं. या स्फोटात 33 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते.
सुन्नीबहुल अफगाणिस्तानमधील IS च्या प्रादेशिक शाखेने शिया आणि सुफी यांसारख्या अल्पसंख्याकांना वारंवार लक्ष्य केलं आहे. आयएस हा तालिबानसारखा सुन्नी इस्लामी गट आहे. परंतु हे दोघे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात.