अमेरिकेवर झालेल्या 9/11 (9/11 Attack) दहशदवादी हल्ल्याला आज 21 वर्ष पूर्ण (21 years of 9/11 Attack) झाले आहे, मात्र अनेकांसाठी त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. अमेरिकेने 11 मार्च 2003 रोजी रावळपिंडी, पाकिस्तान येथून अल-कायदा दहशतवादी खालिद शेख मोहम्मदला अटक करून 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यातील गुन्हेगारांविरुद्ध कारवाईत मोठे यश मिळविले. अल कायदाच्या तिसऱ्या म्होरक्याला पकडण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला तब्बल 18 महिने अथक संघर्ष करावा लागला, मात्र इतके वर्ष झाल्यानंतरही या प्रकरणाचा खटला वारंवार पुढे ढकलला जात आहे. यामुळे पीडितांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे.
या दहशतवादी हल्ल्यांना आज 21 वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही खालिद शेख मोहम्मद आणि या हल्ल्यातील इतर चार आरोपी अजूनही ग्वांतानामो बे येथील अमेरिकन डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत आणि लष्करी न्यायालयासमोर त्यांचा खटला वारंवार पुढे ढकलला जात आहे. या प्रकरणातील सुनावणी मागच्याच महिन्यात पुढे ढकलण्यात आली आहे. 9/11 हल्ल्यात सुमारे 3 हजार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील खटला वारंवार पुढे ढकललं जाणे हे मृतांच्या नातेवाईकांसाठी निराशाजन असल्याचे सांगण्यात येत आहे, कारण या खटल्याच्या माध्यमातून काही तथ्य समोर येतील अशी मृतांच्या नातेवाईकांना आशा आहे.
11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात आपली 25 वर्षांची मुलगी अँड्रिया गमावलेल्या गॉर्डन हेबरमनने सांगितले, या खटल्याचे पुढे काय होणार याबद्दल मला शंकाच वाटत आहे, कारण त्यांनी या खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी चार वेळा वेस्ट बेंड ते ग्वांतानामो प्रवास केला. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. बेंड ते ग्वांतानामो अंतर हे थोडे थोडके नाही तर 5,224 किलोमीटर आहे. या हल्ल्याची सुनावणी मला प्रत्यक्ष ऐकायची आहे आहे. तसेच खालिद शेख मोहम्मद दोषी ठरला तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असेही गॉर्डन हेबरमन म्हणाल्या. अमेरिकेने 2011 मध्ये अल-कायदाचा नेता ओसाबा बिन लादेन आणि त्यानंतर या वर्षी ऑगस्टमध्ये ड्रोन हल्ल्यात दहशतवादी गटाचा नेता अयमान अल-जवाहिरीला ठार केले.