रोम : इटलीच्या एका महिलेने संसदेत आपल्या मुलाला स्तनपान दिलं. याबद्दल त्यांचं कौतुक केले जात आहे. इटलीतील या महिला खासदाराचे नाव गिल्डा स्पोर्टियेलो असे आहे. गिल्डा स्पोर्टियेलो बुधवारी संसदेच्या सभागृहात नवजात बाळाला स्तनपान करणारी पहिली महिला बनल्या. या दरम्यान त्यांनी लोक प्रशासनाशी संबंधित एका बिलावर मतदानही केलं. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. इटलीची संसद चेंबर ऑफ डेप्युटीला पुरुष प्रधान समजले जाते. अशावेळी गिल्डा स्पोर्टियेलो यांनी हे महत्त्वाचं पाऊल उचललं.
गिल्डा स्पोर्टियेलो वामपंथी फाईव्ह स्टार मुव्हमेटच्या सदस्य आहेत. या त्याच खासदार आहेत ज्यांनी संसदेत बाळाला आणू द्यावं, यासाठी लढाई लढली होती. संसदीय सत्राचे अध्यक्ष जियोर्जियो यांनी सांगितले की, सर्व पक्षांनी गिल्डा स्पोर्टियेलो यांच्या स्तनपानाच्या विषयाला समर्थन दिले. त्यांनी गिल्डा स्पोर्टेयेलो यांच्या नवजात बाळ फेडरिकोला शुभेच्छा दिल्या. फेडरिको याच्या दीर्घ, स्वतंत्र आणि शांतीपूर्ण जीवनाला आशीर्वाद दिले.
स्पोर्टियेलो म्हणाल्या, बऱ्याच महिला वेळेपूर्वी बाळांचं स्तनपान थांबवतात. कामावर जाण्यासाठी असं महिलांना करावं लागतं. इटलीच्या सर्वोच्च संसदेत बाळांच्या स्तनपानाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे कोणतीही महिला या अधिकारापासून वंचित राहणार नाही.
ला रिपब्लिका यांच्याशी बोलताना स्पोर्टियेलो म्हणाल्या, हे काम इतर महिलांना प्रेरित करेल. काम करणाऱ्या महिलांना बाळाची काळजी घेऊन काम करता येईल. गेल्या वर्षी संसदीय नियम पॅनलने महिला खासदारांना आपल्या एक वर्षाखालील मुलांना संसदेत घेऊन येण्यास तसेच स्तनपान करण्यास मान्यता दिली होती. जॉर्जिया मेलोनी यांनी ऑक्टोबरमध्ये इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदग्रहन केले. परंतु, इटलीचे दोन तृतांश खासदार पुरुष आहेत.