नवी दिल्ली : नुपूर शर्मांच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ कमेंट केल्याबद्दल आणखी एका तरुणाला धमकावल्याची घटना समोर आली आहे. हे ताजं प्रकरण मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील आहे. जिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) संबंधित असीम जैस्वाल या युवकाला नुपूर शर्मांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याबद्दल धमक्या मिळाल्या आहेत. पाकिस्तानातील (Pakistan) एका नंबरवरून त्याला धमक्या देण्यात आल्या आहेत. खंडवा पोलिसांनी अभाविपशी संबंधित एका विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लॉचा हा विद्यार्थी आणि त्याच्या मित्रांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ कमेंट आणि पोस्ट केली होती. काही दिवसांनी त्याच्या मोबाईलवर पाकिस्तानच्या नंबरवरून धमकीचे मेसेज येऊ लागले. पाकिस्तानी नंबरवरून धमकी मिळाल्यानंतर स्टुडंट आर्मी संघटनेचे अध्यक्ष माधव झा इतर सदस्यांसह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी येथील सीएसपी पूनमचंद्र यादव यांची भेट घेतली. तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, पाकिस्तानातून येणाऱ्या कॉल्समध्ये त्याला आई आणि बहिणीवरून अश्लील शिवीगाळही करण्यात आली होती.
खंडवा जिल्ह्यातील नकोडा नगर येथील रहिवासी असीम जैस्वाल यांनी पोलिसांना सांगितले की 26 जुलैच्या रात्री त्यांना व्हॉट्सअॅपवर +92 या क्रमांकावरून व्हॉईस मेसेज आला, ज्यामध्ये शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीमागे सोशल मीडियावर नुपूर शर्माच्या बाजूने कमेंट केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. +92 हा पाकिस्तानचा कोड आहे. भारताचा कोड +91 आहे.
या प्रकरणी खंडव्याचे पोलिस अधीक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की तरुणांना पाकिस्तानच्या नंबरवरून धमकीचे फोन आले आहेत. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर व्हॉईस मेसेज पाठवून अश्लील शब्द वापरून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सायबर सेलची मदत घेतली जात आहे, पोलीस या प्रकरणाच्या आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
नुपूर शर्मांनी काही दिवसांपूर्वी एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात टिप्पणी केली होती, त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या अनेकांना धमक्या मिळू लागल्या. अशाच एका घटनेत राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिंप्याची दोन जणांनी हत्या केली होती. दोन्ही मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या वादग्रस्त विधानवरून देशभारत मोठा गदारोळ माजला आहे. याच प्रकरणावरून भाजपवरही जोरदार टीका झाली आहे. आता हे प्रकरण थेट पाकिस्तानशी जोडलं गेलं आहे.