Hamas Israel war | युद्धविरामानंतर हमासने केली 13 ओलीसांची सुटका, या देशाच्या 12 नागरिकांचा समावेश

| Updated on: Nov 24, 2023 | 10:02 PM

हमासने ज्या नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले त्यात केवळ इस्रायली नागरिकच नाहीत तर जगातील अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. यातील बहुतांशी नागरिक इस्रायलच्या 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या म्युझिक फेस्टीव्हलसाठी सहभागी होण्यासाठी आले होते.

Hamas Israel war | युद्धविरामानंतर हमासने केली 13 ओलीसांची सुटका, या देशाच्या 12 नागरिकांचा समावेश
hostages
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

जेरुसलेम | 24 नोव्हेंबर 2023 : हमासने इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या अमानूष हल्ल्यानंतर इस्रायलने सुरु केलेल्या युद्धाला 40 हून अधिक दिवस झाल्यानंतर पहिले यश आले आहे. हमासने ओलीस ठवलेल्या 13 नागरिकांची अखेर सुटका केली आहे. यात थायलंडच्या 12 नागरिकांचा समावेश आहे. थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. गाझातून सुटका झालेल्या या नागरिकांना नेण्यासाठी दूतावासातील अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे. सुटका झालेल्या या नागरिकांची नावे आणि इतर माहीती लवकरच सार्वजनिक केली जाणार आहे.

थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत सुरक्षा विभाग आणि गृह मंत्रालयाने त्यांच्या 12 नागरिकांची सुटका केल्याचा बातमीला दुजोरा दिल्याचे म्हटले आहे. इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान युद्धविराम झाला असून झालेल्या कराराप्रमाणे हमास 50 ओलीसांची सुटका करणार आहे. ज्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या बदल्यात इस्रायलही त्यांच्या तुरुंगात बंदी असलेल्या तीन पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करणार आहे. एकूण 150 पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली जाणार आहे. हमास सुटका करणार असलेल्या नागरिकांमध्ये तीन अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या नागरिकांना सोडण्यात येणार आहे.

ओलीसांमध्ये अनेक देशांचे नागरिक

हमासने ज्या नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले त्यात केवळ इस्रायली नागरिकच नाहीत तर जगातील अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. यातील बहुतांशी नागरिक इस्रायलच्या 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या म्युझिक फेस्टीव्हलसाठी सहभागी होण्यासाठी आले होते. हमासने या म्युझिक फेस्टीव्हलसाठी आलेल्या परदेशी नागरिकांना प्रथम टार्गेट केले होते, सर्वाधिक नरसंहार याच ठिकाणी झाला होता. या ठिकाणाहून अपहरण केलेल्या नागरिकांत इस्रायल शिवाय अमेरिका, थायलंड, जर्मनी, अर्जेंटिना, ब्रिटन, फ्रान्स, नेदरलॅंड आणि पोर्तुगालच्या नागरिकांचा समावेश आहे.

12 हजाराहून अधिक मृत्यूमुखी

गाझापट्टीतील हमास अधिकाऱ्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितले की शाळेत 200 जण ठार किंवा जखमी झाले आहेत. तर इस्रायलच्या सैनिकांनी कोणतीही माहीती दिलेली नाही. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्याने इस्रायलने हमासला कायमचे संपविण्याची शपथ घेत युद्ध सुरु केले आहे. हमासने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात 1,200 लोकांची हत्या केली होती तर 240 लोकांना ओलीस ठेवले होते. हमासचे शासन असलेल्या गाझापट्टीतील अधिकाऱ्यांनी सांगितले की मरणाऱ्यांची संख्या 12,300 इतकी झाली आहे. त्यात 5,000 मुलांचा समावेश आहे.

7 ऑक्टोबर पासून युद्ध सुरु

हमासने इस्रायलवर सात ऑक्टोबर रोजी पाच हजार रॉकेट डागत मोठा हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला संपविण्याची शपथ घेत युद्ध सुरु केले आहे. या युद्धात गाझापट्टी बेचिराख करण्यात आली आहे. या युद्धात मरण पावलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची संख्या 12 हजाराहून अधिक झाली आहे. आतापर्यंत गाझापट्टीतील 23 लाख नागरिकांनी आपले घर सोडले आहे. हमासने 200 हून नागरिकांना ओलीस ठेवले आहे.