Russia Ukraine war : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या विनाशकारी युद्धाच्या काळात इंटरनेटवर अनेक धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. युक्रेनचे सैन्य रशियासारख्या महासत्तेशी टक्कर देतानाच नाही तर आता इथली सामान्य जनताही शस्त्रास्त्रांशिवाय रशियन सैन्याचा मुकाबला करताना दिसत आहे. युक्रेनच्या लोकांच्या शौर्याशी संबंधित अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहेत, ज्यामध्ये ते शस्त्राशिवाय रशियन रणगाडे (Tank) थांबवताना दिसत आहेत. पण आता समोर आलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. युक्रेनच्या एका व्यक्तीने व्हिडिओमध्ये काय केले हे पाहून धक्का बसू शकतो. व्हायरल झालेला हा व्हिडिओ युक्रेनमधील बर्डियान्स्कचा (Berdyansk) आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका माणसाची नजर रस्त्यावर पडलेल्या लँड माइनवर पडते. बॉम्बशोधक पथकाची वाट पाहत असताना तो स्वत:च्या हाताने तो उचलतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने जळती सिगारेट तोंडात ठेवली आहे.
या व्यक्तीचे हे धाडस पाहून सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहणारे लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. सिगारेटचा धूर उडवत ही व्यक्ती भूसुरुंग रस्त्याच्या कडेला अगदी सहजतेने घेऊन जात आहे, हे तुम्ही पाहू शकता. माणसाने ही धोकादायक वस्तू जणू खेळण्यासारखी धरली आहे.
द न्यू व्हॉइस ऑफ युक्रेन या हँडलवरून या युक्रेनियन व्यक्तीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की हा व्हिडिओ युक्रेनच्या बर्दियान्स्कचा आहे. जिथे एका माणसाला रस्त्यावर भूसुरुंग दिसला, त्याने आपला जीवा धोक्यात घालून तो रस्त्याच्या कडेला नेला, जेणेकरून युक्रेनियन सैन्यासाठी मार्ग मोकळा होईल. ही 38 सेकंदांची व्हिडिओ क्लिप लोक पुन्हा पुन्हा पाहत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत 27 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण या युक्रेनच्या नागरिकांच्या धाडसाला सलाम करत आहे. बहुतेक लोकांनी युक्रेनमधील या जीवघेण्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अहंकाराच्या लढाईत सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. युद्धामुळे देशवासीयांचा जीवही धोक्यात आला आहे. आतापर्यंत साडेसात हजारांहून अधिक लोकांनी ही व्हिडिओ पोस्ट शेअर केली आहे.
A Ukrainian in Berdyansk spotted a mine on the road and didn’t wait around for a bomb disposal unit – at great risk to life and limb, he removed the mine, clearing the way for the Ukrainian military. pic.twitter.com/iC9ZTrixlC
— The New Voice of Ukraine (@NewVoiceUkraine) February 27, 2022