नवी दिल्ली | 23 ऑक्टोबर 2023 : हमास-इस्रायल युद्धा दरम्यान इस्रायलचे समर्थन करणे भारतीय वंशाच्या एका डॉक्टराला महाग पडले आहे. बहारीनच्या रॉयल हॉस्पिटलमध्ये कार्यरत भारतीय वंशाचे डॉक्टर सुनील राव यांनी सोशल मिडीयावर एक्सवर ( ट्वीटर ) एक पोस्ट केली होती. यामुळे नाराज झालेल्या हॉस्पिटल प्रशासनाने डॉ.राव यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. त्याच्या एका सहकाऱ्या त्यांच्या ट्वीटबद्दल रुग्णलयाच्या प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर डॉ.राव यांना नोकरीवरून काढल्याचे हॉस्पिटलने ट्वीटरवरून जाहीर केले आहे.
इंटरनल मेडीसिनचे तज्ज्ञ असलेल्या डॉ. सुनील राव यांना त्यांच्या ट्वीटमुळे कामावरुन काढले असल्याचे रॉयल हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे. यात हॉस्पिटलने म्हटले आहे की डॉ.राव यांनी आपल्या ट्वीटमध्ये अशी वक्तव्य केली आहे ज्यामुळे आमच्या समाजाचा अपमान झाला आहे. आम्ही हे स्पष्ट करतोय की त्यांचे ट्वीट आणि विचारधारा त्यांची व्यक्तीगत भूमिका आहे त्याचा हॉस्पिटलचा काही संबध नाही. त्याचे असे वागणे आमच्या नियमाचे उल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही कायदेशीर कारवाई करीत त्यांची सेवा तात्काळ प्रभावाने समाप्त करीत आहोत असे हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, डॉ. राव यांनी आपल्या ट्वीटमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तरी मी माफी मागत असल्याचे सोशल मिडीयावर म्हटले आहे. ते या माफीनाम्यात पुढे म्हणतात की, मी या व्यासपीठावर व्यक्त केलेल्या मताबद्दल माफी मागत आहे. ते वर्तमान घटनेसंदर्भात असंवेदनशील वर्तन होते. एक डॉक्टर म्हणून सर्वाचे जीवन वाचविणे हे माझे कर्तव्य असून सर्व समान आहेत. मी या देशाचा आणि तेथील धर्माचा आदर करतो. मी गेल्या दहा वर्षांपासून येथे रहात आहे. मात्र, डॉ. राव यांच्या माफीनाम्यानंतर देखील हॉस्पिटल प्रशासनाचे मन द्रवलेले नाही.
डॉ. राव यांच्यावर हॉस्पिटल प्रशासन इतके नाराज झाले की रॉयल हॉस्पिटलने त्यांच्या वेबसाईटवरुन त्यांची प्रोफाईल त्वरीत हटविली आहे. डॉ. सुनील राव हे आंध्र प्रदेश मेडीकल कॉलेज, विशाखापट्टणम आणि कर्नाटकातील मंगळुरुच्या कस्तुरबा मेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. डॉ. राव यांच्याकडे 20 वर्षांचा अनुभव आहे.
गेल्या 7 ऑक्टोबर पासून हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध पेटले आहे. या दोन देशांच्या युद्धाने जगाची दोन भागात विभाजन झाले आहे. बहारीनसह अनेक मुस्लीम देश पॅलेस्टिनींची बाजू घेत आहेत. तर इस्रायलवर आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केल्याचा आरोप करीत आहेत. इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्बहल्ले सुरुच ठेवले आहेत. अमेरिकेच्या अनेक प्रयत्नानंतर साल 2020 मध्ये इस्रायलबरोबर बहारीनचे राजकीय संबंधांची सरुवात झाली होती. परंतू गाझावरील चढाईनंतर या नात्यांमध्ये पुन्हा दुरावा निर्माण झाला आहे.