Europe Visa Centre : बांग्लादेशात शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारताशी या देशाचे संबंध बिघडले आहे. अलिकडे घडलेल्या अनेक घटनात बांग्लादेश उघडपणे भारताचा विरोध करीत आहे. ताज्या घटनाक्रमात बांग्लादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख प्रोफेसर डॉ. मोहम्मद यूनुस यांनी युरोपीय देशांकडे एक महत्वाची मागणी केली आहे. युरोपीय देशांनी त्यांची व्हीसा केंद्रे दिल्लीतून हटवून ढाका वा अन्य शेजारील देशात स्थलांतरीत करावी अशी मागणी प्रोफेसर डॉ. मोहम्मद यूनुस यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. जर असे झाले तर भारताचे नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे.
एकीकडे बांग्लादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहे. त्यातच आता भारताशी परराष्ट्र संबंध देखील बिघडत चालले आहे. बांग्लादेशाची ढाका आता बटाटा आणि कांद्यासारख्या पदार्थांची आयात करण्यासाठी अन्य स्रोतांचा विचार करत असल्याचे वृत्त स्थानिक मीडियाने दिलेले आहे. डॉ. मोहम्मद युनुस यांनी ढाका येथील तेजगाव स्थित आपल्या कार्यालयात युरोपीय देशांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेत युरोपीय देशाची दिल्लीतील व्हीसा केंद्रे हटवून ढाका किंवा अन्य शेजारील देशात स्थापन करावी अशी मागणी केली आहे. या बैठकीला ढाका आणि नवी दिल्लीतील दोन्ही जागी नेमणूकीला असलेले १९ हून अधिक दुतावासातील अधिकारी उपस्थित होते.
व्हीसाची मागणी वाढण्यामागे भारताने बांग्लादेशींचा व्हीसांवर लादलेले प्रतिबंध जबाबदार आहेत असे मोहम्मद युनुस यांनी म्हटले आहे. बांग्लादेशी नागरिकांसाठी व्हीसावर भारताने लावलेल्या प्रतिबंधांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे युरोपीयन व्हीसा प्रक्रीया पार पाडण्यासाठी दिल्लीचा प्रवास करु शकत नाहीत. त्यामुळे युरोपात शिकू इच्छीणाऱ्या प्रतिभावंत बांग्लादेशी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे असेही मोहम्मद युनुस यांनी म्हटले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की व्हीसा कार्यालयांना ढाका किंवा कोणा नजीकच्या देशात स्थलांतरीत केले तर बांग्लादेश आणि युरोपीयन देश दोन्हींचा फायदा होईल. ढाकाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बुल्गारियाचे उदाहरण दिले. ज्यांनी बांग्लादेशींसाठी त्यांचे व्हीसा केंद्र आधी इंडोनेशिया आणि व्हीएतनाममध्ये स्थलांतर केले होते. आम्ही ढाकाच्या प्रस्तावाचा विचार करु आणि नव्या बांग्लादेशाच्या निर्मितीसाठी मदत आणि सल्ला देण्यास तयार असल्याचे युरोपीय देशांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बांगलादेशाबद्दल चुकीचा माहिती पसरविली आज असून त्याचा प्रतिकार करण्यासाठी देखील युनुस यांनी युरोपियन युनियनकडे मदत मागितली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर त्यांनी देश अस्थिर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशातील सर्व राजकीय पक्ष आणि धार्मिक समुदायांच्या प्रतिनिधींशी आपण चर्चा केल्याचे युनूस यांनी म्हटले आहे.
या दरम्यान भारताने बांगलादेशी नागरिकांचा व्हीसा वाढविण्यासाठी पाऊले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे बांगलादेशाने सोमवारी म्हटले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची डॉ.युनुस यांनी भेट घेतल्यानंतर भारताने हे वक्तव्य आले आबे. पर्यावरण सल्लागार सईदा रिझवाना हसन यांनी मीडियाला सांगितले की विक्रम मिस्री यांनी यांसदर्भात योग्य पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.