शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडल्यानंतरही बांग्लादेशमधील आंदोलन थांबण्याचं नाव घेत नाहीये. आताही बांग्लादेशमध्ये आंदोलन सुरु आहे. बांग्लादेशातील नागरिकांनी आता सर्वोच्च न्यायालयाला घेरलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन केलं जात आहे. आंदोलक इतके आक्रमक होते की मुख्य न्यायाधीश ओबैदुल हसन यांना जमावापुढे झुकावं लागलं. अखेर त्यांनी मुख्य न्यायाधिशपदाचा राजिनामा दिला आहे. मात्र तरिही आंदोलक मात्र आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे.
मुख्य न्यायाधीश ओबैदुल हसन यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्यामुळे ओबैदुल हसन यांना मुख्य न्यायाधिशपदावरून पायउतार व्हावं लागलं. अपील विभागाच्या न्यायाधीशांनाही यावेळी राजीनामा द्यावा लागला आहे. ओबैदुल हसन हे शेख हसिना यांचे निकटवर्तीय मानले जातात. मागच्या वर्षी त्यांची मुख्य न्यायाधिशपदी नियुक्ती केली गेली होती. मात्र शेख हसिना यांनाच बांग्लादेशच्या नागरिकांनी पंतप्रधानपदाचा राजिनामा द्यायला भाग पाडलं. त्यानंतर ओबैदुल हसन यांनाही आंदोलकांसमोर झुकत पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे.
मुख्य न्यायाधिशांनी संपूर्ण न्यायालयाची बैठक बोलावल्याची आधी बातमी आली. त्यामुळे आंदोलक भडकले. विद्यार्थी, वकील यांच्यासह अन्य शेकडो आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. अब्दुल मुकाद्दिम नावाच्या आंदोलकाने दावा केला की मुख्य न्यायाधीश अंतरिम सरकारला अवैध ठरवण्याचा कट रचत आहेत.
शेख हसिना यांच्या विरोधातही बांग्लादेशमध्ये आंदोलन झालं. पंतप्रधानांच्या निवास्थानावर विद्यार्थी आणि आंदोलक पोहोचले. शेख हसिना यांना देश सोडण्यास भाग पाडलं गेलं. पंतप्रधानपदाचा शेख हसिना यांनी मायदेश सोडत भारतात आल्या. भारतात सुरक्षित आणि गुप्त ठिकाणी शेख हसिना सध्या राहत आहेत. हसिना यांचा मुलगा सजीब वाजेद यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बांग्लादेशमधील परिस्थिती पूर्ववत झाली की माझी आई पुन्हा मायदेशी परतेल, असं त्यांनी म्हटलं आहे.