नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : इराणने अचानक मंगळवारी पाकिस्तानात घुसून अतिरेकी संघटना ‘जैश अल अदल’ च्या प्रशिक्षण स्थळांवर बॉम्बहल्ले केले आहेत. या घटनेने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इराणच्या लढाऊ विमानांनी बलुचिस्तान प्रांतातील एका गावात एअरस्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात जैश अल अदलच्या दोन ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. पाकिस्तान या हल्ल्याने संतापला आहे. याचा गंभीर परिणाम होतील अशी धमकी त्याने इराणला दिली आहे. परंतू पाकिस्तानवर कुठल्या देशाने एअर स्ट्राईक केल्याची ही काही पहिलीच घटना नाही. भारताचे आणि पाकिस्तानचे वैर साऱ्या जगाला ठावून आहे. परंतू अन्य अनेक देश आहेत, ज्यांनी पाकिस्तानला अद्दल शिकविली आहे.
पाकिस्तान स्वत:ला न्युक्लिअर पॉवर समजतो. जगातील एक ताकदवान देश असल्याच्या बाता मारत असतो. इराणनेच नाही तर अनेक देशांनी पाकिस्तानाच्या हद्दीत घुसून कारवाई केली आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तानने पोकळ धमक्या देऊन गप्पपणे आपले शेपूट गुंडाळून मागे घेतले आहे. तर पाहूयात कोण ? कोणत्या ? देशांनी पाकिस्तनाच्या सीमेत घुसून हल्ला केला आहे.
पाकिस्तानवर नेहमीच अतिरेक्यांना पाठिशी घातल्याचा आरोप होत असतो. पाकिस्तान नेहमीच या आरोपांना फेटाळत आला आहे. अमेरिकेवर 9/11 चे हल्ले करणारा जगातील सर्वात क्रुरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या एबटाबाद शहरात आश्रय घेतला होता. त्याला अमेरिकन लष्कराच्या सील कमांडोंनी एमएच-60 हेलीकॉप्टर्सच्या मदतीने एबटाबादमध्ये उतरुन सिक्रेट ऑपरेशनमध्ये 1 मे 2011 रोजी खात्मा केला होता. या ऑपरेशनबद्दल पाकिस्तानच्या नेव्हीला देखील काही थांगपत्ता लागला नव्हता.
भारतीय वायुसेनने साल 2019 मध्ये पाकिस्तानच्या सीमेत घुसून अतिरेकी स्थळांवर हल्ले केले होते. पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू – काश्मीरच्या पुलवामा येथे आत्मघाती हल्ला करुन सीआरपीएफच्या 40 जवानांचे बळी घेतले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर भारताने उत्तर म्हणून बालोकोट परिसरात एअरस्ट्राईक केला होता.
साल 2016 च्या 29 सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानी सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकमध्ये पीओकेमधील अनेक अतिरेकी प्रशिक्षण कॅंपवर हल्ला करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरच्या उरी येथील इंडीयन आर्मी कॅंपवर झालेल्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते.