नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : चीन (China-Pakistan) अनेक देशात त्याचा अजेंडा राबवत आहे. वन बेल्ट वन रुट या माध्यमातून साम्राज्यविस्ताराचं नवीन मॉडेल त्याने विकसीत केले आहे. त्याला अनेक देश बळी पडेल. विकासाच्या आडून जागतिक महासत्ता (World Power) होण्याचे स्वप्न चीन पाहत आहे. चीनने अनेक देशांना देशोधडीला लावले आहे. कर्जाच्या विळख्यात अनेक देश अडकले आहेत. आपला शेजारील श्रीलंका हे तर त्याचे ताजे उदाहरण आहे. पाकिस्तान चीनच्या इशाऱ्यावर नाचत आहे. आता तिथला मीडिया (Pakistani Media) पण लवकरच चीनचे गोडवे गाणार आहे. कारण तरी काय?
काय आहे योजना
चीन पाकिस्तानमध्ये अनेक प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे करांचा मोठा बोजा तर पडणार आहे, पण कर्ज ही वाढत आहे. विकासाच्या नावावर देशात खेळखंडोबा होत आहे. तिकडे बलोच नागरिकांना चीनची ही चाल मान्य नाही. त्यांच्या स्वातंत्र्यावर चीन गदा आणत असल्याची भीती त्यांना वाटत आहे. जनमत सातत्याने चीनविरोधात जात असल्याने पाकिस्तानमधील अस्थिर सरकार पण हादरले आहे. आता पाकिस्तानी मीडियाच खिशात घालण्याची तयारी चीनने केली आहे. त्यासाठी अब्जावधींचे खास पॅकेजला मंजुरी देण्यात आल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे.
असा आहे अजेंडा
चीन पाकिस्तानमधील माध्यमांना पैशांच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न करत आहे. चीनविरोधात बातमी येऊ नये यासाठी माध्यमांवर दडपण आहे. तसेच चीनच्या प्रकल्पाचे फायदे, स्थानिकांना नोकऱ्या, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला त्यामुळे उभारी मिळत असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. त्यासाठी माध्यमांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे. काही माध्यमांनी त्याला कडाडून विरोध सुरु केला आहे.
कोणी केला दावा
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गेल्या आठवड्यात याविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात चीनचा पाकिस्तानमधील माध्यमांमध्ये हस्तक्षेप वाढल्याचे म्हटले आहे. चीनविरोधात बातम्या येऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. चीनची प्रतिमा उजळ करण्यासाठी जाहिरातींचे आमिष दाखविण्यात येत आहे. विरोधात बातमी छापणाऱ्या वृत्तपत्र, माध्यमांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. माध्यमांना आपल्या बाजूने करण्यासाठी चीनकडून खास पॅकेजची तयारी करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यासाठी चीन अब्जावधींचा चुराडा करत आहे.