जगाच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी येतेय ती थेट दक्षिण कोरियातून (South Korea). या ठिकाणी कोरोनाने (Corona) अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एका दिवसात तब्बल 6 लाख 21 हजार 328 नवे रुग्ण सापडलेत. ही आतापर्यंतची एका दिवसातली दक्षिण कोरियातली सर्वात मोठी रुग्णवाढ असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे येथे कोरोनाचे 429 नवीन मृत्यूही (death) नोंदवलेत. ही सुद्धा विक्रमी नोंद असल्याचे समोर येतेय. दक्षिण कोरियात कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा प्रसार झपाट्याने होतोय. त्यामुळे ही रुग्णवाढ होत असल्याचे समजते. कोरियाची रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक संस्था ‘केडीसीए’ ने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरियात कोरोना प्रकोपाच्या दरम्यान 44,903,107 जणांचे कोविड-19 लसीकरण झाले आहेत. त्यात 44,428,431 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत. तर 32,064,014 जणांनी कोरोना लसीचा बूस्टर डोसही घेतला आहे.
डेल्टाक्रॉनची भीती
सध्या कोरोना विषाणूचा डेल्टाक्रॉन हा नवा प्रकार समोर आलाय. हा नवा विषाणू डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या संयोगातून बनल्याचे समजते. काही युरोपियन देश विशेषतः फ्रान्स, नेदरलँड आणि डेन्मार्कमध्ये याचे नवे रुग्ण आढळलेत. मात्र, हा विषाणू किती धोकादायक आहे. त्याच्या प्रसाचाराचा वेग किती आहे, याची माहिती अजून समोर आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड 19 चे तांत्रिक प्रमुख मारिया वान केरखोव यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यात या नव्या विषाणूमध्ये अजून तरी कोणता गंभीर बदल झालेला नसल्याचे म्हटले आहे. या विषाणूवर वैज्ञानिक लक्ष ठेवून आहेत.
चीनमध्ये स्टेल्थ ओमिक्रॉन
चीनमध्ये 2019 च्या शेवटी वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, तेथे गेल्या वर्षभरापासून कोरोना मृत्यूची अधिकृत नोंद नसल्याचे समजते. तरीही शेन्झेनच्या दक्षिणेकडील टेक हबमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत. त्यामुळे तेथे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शांघाय आणि इतर शहरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणू प्रकारावर चीनमध्ये नियंत्रण मिळवण्यात आले होते, पण आता ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट स्टेल्थ ओमिक्रॉनमुळे या ठिकाणी रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे.