नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : पाकिस्तानात भारताच्या शत्रू असलेल्या वॉण्टेड अतिरेक्यांच्या हत्येचा सिलसिला सुरुच आहे. शाहीद लतिफ आणि मुल्ला बाहौर नंतर आता लश्कर – ए – जब्बारचा संस्थापक दाऊद मलीक याची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घालून हत्या झाली आहे. पाकिस्तान उत्तरी वजीरीस्तान भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या घातल्याने तो ठार झाला. दाऊद मलिक हा वॉण्टेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा जवळचा साथीदार मानला जातो.
पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसार शुक्रवारी सकाळी उत्तरी वजीरीस्तान आदिवासी जिल्ह्याच्या मिराली परिसरात अज्ञात बुरखेधाऱ्यांनी घात लावून दाऊद मलिक याच्यावर गोळीबार केला. मलिक याला एका खाजगी क्लिनिकमध्ये मारेकऱ्यांनी ठार केले आणि ते घटनास्थळावरुन पळून गेले.
दाऊद मलिक भारताचा मोस्ट वॉण्टेड अतिरेकी मौलाना मसूद अझहर याचा जवळचा साथीदार मानला जातो. या ताज्या घटनेने पाकिस्तान सक्रीय अतिरेकी संघटनात सुरु असलेल्या धुमश्चक्रीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. गेल्या काही आठवड्यात भारताला हवे असलेले अनेक अतिरेकी पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांकडून झालेल्या गोळीबारात लागोपाठ ठार झाले आहेत.
या आधी 11 ऑक्टोबर रोजी भारताला हवा असलेला सगळ्यात मोठा दहशतवादी आणि 2016 रोजी पठाणकोट अतिरेकी हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार शाहीद लतिफ याची पाकिस्तानच्या सियालकोट भागात अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या झाली. तर 1 ऑक्टोबर रोजी लश्कर-ए-तोयबाचे माजी सदस्य आणि मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद याचा साथीदार मुफ्ती कैसर फारुक याची पाकिस्तान हत्या झाली. ही घटना लश्कर ए तोयबाशी संबंधित अन्य मौलवी मौलाना जियाउर्रहमान याच्या हत्येशी खूपच जुळत आहे.