नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर 2023 : पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांच्या एका वक्तव्याने सध्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पोप फ्रान्सिस यांना एकविसाव्या शतकातील पोप का म्हणतात, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. ते 266 वे पोप आहेत. व्हॅटकिन सिटीतील कुजबूज पण जगातील ख्रिश्चन धर्मीयांसाठी महत्वाची असते. येथे तर पोप फ्रान्सिस यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली नसेल तर नवलच. अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रे प्रगतीशील म्हणून ओळखली जातात. यातील काही देशांनी समलिंगी संबधांना मोकळीक दिली असली तरी अजूनही अनेक देशात या संबंधांना पुरेसे बळ मिळालेले नाही. त्यातच पोप फ्रान्सिस यांच्या वक्तव्याने समलिंगी जोडप्यांचा ( Same Sex Couples) विषय ऐरणीवर आला आहे.
काय म्हणाले पोप
कॅथेलिक चर्चला समलिंगी जोडप्यांना आशिवार्द प्रार्थनांना मोकळीक असल्याचे पोप फ्रान्सिस यांनी सुचवले आहे. एका प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी याविषयीचे विचार मांडले. समलिंगी जोडप्यांचे लग्न, त्यांना आशिर्वाद देण्याच्या अनुषंगाने या प्रश्नाचा रोख होता. त्यावर आपण न्यायाधीश होता कामा नये की जे नाकारतात, मनाई करतात अथवा वगळतात, असे उत्तर पोप यांनी दिले. याविषयीचे त्यांचे विचार त्यांनी बिनदिक्कतपणे मांडले.
हे पापच
पण पुढे बोलताना त्यांनी समलिंगी संबंध हे वस्तूनिष्ठपणे पाहिल्यास पापच असल्याचे मत मांडले आणि समलिंगी विवाहांना मान्यता देणार नाही, असे स्पष्ट केले. बेल्जियम आणि जर्मनीसह अनेक देशांतील बिशप समलिंगी जोडप्यांना आशिर्वाद देत असल्याचे समोर आले आहे. पण चर्चच्या प्रशासनाने याविषयी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चर्च ऑफ इंग्लंडमधील वरिष्ठांनी समलिंगी जोडप्यांना आशिर्वादाच्या प्रार्थनांना परवानगी देण्यास पाठिंबा दर्शविला होता.
पोप यांनी समलिंगी जोडप्यांच्या आशिवार्द प्रार्थनेविषयी मांडलेले हे मत जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. जगात अजूनही समलिंगी संबंधाविषयी समाजाच्या, धर्माच्या भावना तीव्र आहेत. या संबंधांना विरोध आहे. जाहिररित्या असे संबंध ठेवण्याबाबत समाजाचा आक्षेप सगळीकडेच कायम आहे. त्यामुळे पोप यांच्या या वक्तव्याची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली आहे.