तालिबानच्या राजवटीमध्ये अफगाणिस्तानमधील महिलांवर बंधनं घालणं सुरूच आहे. दररोज घालण्यात येणाऱ्या नव्या आणि कडक बंधनांमुळे येथील महिलांना आयुष्य जगणं अवघड झालं आहे. आता तालिबानकडून अफगाणिस्तानमधील महिलांसाठी नवा फतवा जारी करण्यात आला आहे. तालिबानचा नेता हिबतुल्लाह अखुंदजादाने याबाबत आदेश दिले आहेत. नव्या फतव्यानुसार नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतीला अशी कोणतीही खिडकी नसावी ज्या खिडकीमधून घरातील महिला दिसतील, किंवा त्या खिडकीमध्ये येऊन महिलांना बसता येईल. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला घरातील महिला दिसता कामा नये, असा आदेश तालिबानचा नेता अखुंदजादाने दिला आहे.
दरम्यान हा आदेश फक्त नव्या इमारतींनाच लागू नसणार आहे, तर देशात ज्या जुन्या इमारती आहेत त्यांच्यासाठी देखील हा नियम लागू करण्यात आला आहे. ज्या इमारतींना अशा खिडक्या आहेत, त्या झाकून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वंयपाक घराला खिडकी ठेवू नका, अशा खिडक्यांमधून घरातील महिला सहज बाहेरच्या लोकांना दिसू शकतात असं या आदेशात म्हटलं आहे. कुठल्याही घराला अशा खिडक्या असतील तर त्या झाकून टाकण्याची जबाबदारी ही त्या घराच्या मालकावर असणार आहे.
नव्या इमारती बनवताना त्या इमारतीला अशाप्रकारे खिडक्या बनवू नयेत, इमारतीच्या खिडक्या कोणत्या दिशेनं आहेत, आणि त्यातून घरातील महिला दिसतात का? हे तपासण्याची जबाबदारी तेथील नगपालिकेंच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. जर असं एखादं घर आढळल्यास त्याची परवानगी रद्द करावी असे आदेश देखील तालीबान्यांकडून देण्यात आले आहेत.
तर दुसऱ्या एका आदेशामध्ये असं देखील म्हटलं आहे की, कुठल्याही अफगाणिस्तानी महिलेला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी कामाला ठेवू नये, असे केल्यास त्यांची परवानगी रद्द करण्यात येईल. समोर आलेल्या माहितीनुसार कामावर असताना महिला योग्य पद्धतीने हिजाब घालत नाही, असं येथील सरकारला वाटतं त्यामुळे आता या महिलांना काम करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या अर्थमंत्रालयाकडून याबाबत एक पत्रक जारी करण्यात आले आहे, त्यात असं म्हटलं आहे की सरकारच्या आदेशाचं पालन न केल्यास कंपनीचं लायन्सस रद्द करण्यात येईल.