अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची धामधूम आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट सामना होत आहे. अमेरिकन निवडणुकीत उलटफेर झाल्यास कमला हॅरिस या देशाच्या इतिहासातील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. आज राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्यावर अनेक ठिकाणी भारतीय आणि आफ्रिकन समाज नाराज असल्याची वृत्त येऊन धडकली. आता निकालानंतर चित्र स्पष्ट होईल. पण देशातील या गावातही निकालापूर्वीच कमला हॅरिस यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहे. गावकऱ्यांना त्या निवडून येतील असा विश्वास आहे.
तुलसेंद्रपुरममध्ये एकच जल्लोष
तामिळनाडू राज्यातील तुलसेंद्रपुरममध्ये सध्या एकच लगबग उडाली आहे. कारण या गावाचे कमला हॅरिस यांच्याशी थेट संबंध आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभ्या ठाकलेल्या कमला हॅरिस यांचे पूर्वज याच गावचे रहिवाशी आहेत. कमला यांच्या आईचे वडील, त्यांचे आजोबा, P. V. Gopalan हे मूळचे याच गावचे. ते अगोदर चेन्नई येथे स्थलांतरीत झाले. तेथून ते झाम्बिया येथे पोहचले. त्यांची आई श्यामला यांचे शिक्षण गावाबाहेरच अधिक झाले. पुढे त्यांनी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतले. अर्थात कमला अजूनही आजोळाला विसरल्या नाहीत. त्यांनी अनेक मंचावरून आईने सांगितलेल्या गावच्या कथा सांगितल्या आहेत.
अन् आठवला भारत
अर्थात कमला हॅरिस या आफ्रिकन भारतीय वंशाचा फारसा गवगवा करत नाहीत. पण प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी सोशल मीडिया X वर त्यांची भारताशी कशी नाळ आहे, याची आठवण करुन दिली. माझ्या आईने मला आणि माझी बहीण माया यांना धैर्य आणि निर्धारकपूर्वक पुढे जाण्याची शिकवण दिल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. श्यामला गोपालन हॅरिस यांच्या धड्यांमुळे आयुष्यात पुढे जाता आल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
भारतीय संस्कृतीपासून दूर नाही
कमला हॅरिस यांचे कारकीर्द पूर्णपणे अमेरिकेत घडली असली. त्या तिथेच लहानाच्या मोठ्या झाल्या असल्या तरी त्यांनी भारतीयपण जपलं आहे. त्यांची मावशी डॉ. सरला यांनी याविषयीची आठवण सांगितली होती. त्यानुसार, कमला यांना तामिळ भाषेतील काही शब्द येतात. त्यांना भारतीय संस्कृती, हिंदू पुराणकथा, दक्षिण भारतीय संस्कती, खाद्यसंस्कृती यांची चांगलीच ओळख आहे. बालपणी त्या अनेकदा भारतात आल्या आहेत. त्यांनी त्यावेळी भारत आणि नातेवाईक यांची भेट घेतली आहे.