पंतप्रधान मोदींना भेटताच एलन मस्क खळखळून हसत म्हणाले, I am a fan of Modi!

| Updated on: Jun 21, 2023 | 10:30 AM

Elon Musk Reaction on PM Narendra Modi Meeting : I am a fan of Modi!; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर एलन मस्क यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदींना भेटताच एलन मस्क खळखळून हसत म्हणाले, I am a fan of Modi!
Follow us on

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांची भेट घेतली. या भेटीचे फोटोही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेअर करण्यात आले आहेत. एलन मस्क यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. I am a fan of Modi!, असं एलन मस्क यांनी म्हटलं आहे.

न्यूयॉर्कमध्ये मोदी आणि एलन मस्क यांची भेट झाली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना एलन मस्क यांना नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा एलन मस्क खळखळून हसले अन् म्हणाले, I am a fan of Modi! याचा व्हीडिओ भाजप नेत्यांकडून शेअर करण्यात आला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा व्हीडिओ शेअर केला आहे.

एलन मस्क यांनी यावेळी बोलताना भारताच्या भविष्यावर टिपण्णी केली. मी भारताच्या भविष्याबद्दल खूप उत्सुक आहे. जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत भारतात अधिकचा आशावाद आहे, असं एलन मस्क म्हणाले.

पंतप्रधान मोदी हे खरंच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे आम्हीही भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक झालो आहोत, असं त्यांनी म्हटलं.

एलन मस्क यांनी 2015 मध्ये झालेल्या मोदींसोबतच्या पहिली भेटीचीही आठवण सांगितली आहे. 2015 लाही पंतप्रधान मोदींसोबतची भेट खूप छान होती. तेव्हा त्यांनी आमच्या फ्रेमोंट फॅक्ट्रीला भेट दिली होती, असं एलन मस्क म्हणालेत.

मोदी खरोखरच भारतासाठी योग्य गोष्टी करत आहेत. ते खुल्या मनाने नवीन कंपन्यांचं भारतात स्वागत करण्यासाठी तयार आहेत. पण त्याच सोबत भारताचा फायदाही ते पाहतात. हेच होणं अपेक्षित आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी एलन मस्क यांच्यासोबतच्या या भेटीचा फोटो शेअर केला आहे. ही भेट अतिशय चांगली राहिली. ऊर्जेपासून ते अध्यात्मापर्यंतच्या मुद्द्यांवर आमची दिलखुलास चर्चा झाली, असं मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एलन मस्क यांनीही मोदींचं ट्विट रिट्विट करत खरंच खूप चांगला संवाद झाला, असं म्हटलं आहे.