कैरो : इजिप्तमधील सुएझ कालव्यात (Suez Canal) गेल्या काही दिवसांपासून अडकलेलं महाकाय जहाज (Ever Given Ship) अखेर बाहेर काढण्यात आलं आहे. हे जहाज गाळात रुतल्यामुळे युरोप आणि आशियातील व्यापार ठप्प झाला होता. या मार्गावरील समुद्री वाहतूक करणारे शेकडो जहाजांची रांगच लागली. यामुळे दररोज 7500 कोटी रुपयांच्या व्यापाराचं नुकसान झालं. मात्र अखेर हे रुतलेलं जहाज बाहेर काढण्यात यश आलं आहे. (EVER GIVEN ship has been UNSTUCK and Moving into Suez Canal after 6 Days)
एव्हरग्रीन जहाजाचा मागील भाग फिरल्यामुळे या कालव्याचा रस्ता खुला झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, जवळपास आठवडाभर अडकलेलं हे विशाल जहाज आता पाण्यावर तरंगू लागलं आहे, अशी माहिती इंचकॅम्प शिपिंग सर्व्हिसेसने दिली आहे. हे जहाज आता चालू करण्याच्या स्थितीत आणण्याचं काम सुरु आहे.
जागतिक समुद्र सेवा देणारी संस्था इंचकॅम्पने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार सकाळी 4.30 वाजता जहाज पुन्हा तरंगू लागलं. आता या जहाजावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. जहाजांना ट्रॅक करणारी संस्था वेसलफायंडरनेही आपल्या वेबसाईटवर या जहाजाचं स्टेटस अपडेट करुन, जहाज आता आपल्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे.
400 मीटर लांब एव्हरग्रीन हे जहाज मंगळवारी जोरदार वाऱ्यामुळे तिरकं होऊन अडकलं होतं. हे जहाज मध्येच अडकल्यामुळे अनेक छोट्या जहाजांचे मार्गच बंद झाले. परिणामी युरोप आणि आशियामधील व्यापार अक्षरश: ठप्प झाला.
जवळपास 369 जहाज या कालव्यातील रस्ता सुरु होण्याची वाट पाहात होते. सुएझ कालवा प्राधिकरणाचे चेअरमन ओसामा रबी यांनी इजिप्तमधील स्थानिक माध्यमांना याबाबतची माहिती दिली होती. त्यानुसार, सुएझ कालव्यात अनेक मालवाहू जहाजं, तेल टँकर, एलपीजी गॅस यासारखी वाहतूक करणारी जहाजं अडकून पडली.
भारताकडून कोणत्या उपाययोजना?
कार्गोच्या प्राधान्यानुसार FIEO, MPEDA आणि APEDA संयुक्तपणे खराब होणाऱ्या कार्गोंची ओळख पटवतील आणि त्यांच्यासाठी शिपिंग लाईनसोबत काम करतील. या संकटाच्या काळात किमतीत वाढ न करता दर स्थिर ठेवावेत असं आवाहन शिपिंग लाईनला करण्यात आलंय. बंदरं आणि जलमार्ग मंत्रालयाने या बंदरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
अडकलेल्या जहाजावर मोठ्या प्रमाणात भारतीय कर्मचारी
सुएझ कालव्यातील अडकलेलं महाकाय जहाज काढण्याचं काम सुरुच होतं. विशेष म्हणजे या जहाजावर बहुतांश कर्मचारी हे भारतीय आहेत. तसेच शिपची कॅप्टन इजिप्तची आहे.
सुएझ कालव्याचं वैशिष्ट्यं काय?
सुएझ कालवा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडतो. हा कालवा 193.3 किलोमीटर लांबीचा आहे. त्याचे बांधकाम 1869 मध्ये झाले. सुएझ कालव्याचं एक टोक उत्तरेला बुर सैद शहराजवळ आहे, तर दक्षिणेकडील टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ आहे.
सुएझ कालव्यामुळे युरोप आणि आशिया या दोन खंडांमधील सागरी वाहतूक कमी वेळेत वेगाने करणं शक्य झालं. सुएझ कालवा सुरु होण्याआधी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला जवळपास 7000 किलोमीटर लांब वळसा घालून जावं लागायचं. मात्र, हा कालवा झाल्याने हे 7000 किमी अंतर कमी होऊन 193.3 किमी झालं.
संबंधित बातम्या
Suez Canal Blockage : सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने जगभरातील व्यापार ठप्प, भारतावर काय परिणाम?
PHOTOS : सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट, आता अमेरिका मदत करणार
Suez canal | सुएझ कालव्यातील जहाज काही निघेना; नेटकरी म्हणतात बाहुबलीला बोलवा, भन्नाट मीम्स व्हायरल