कराची : पाकिस्तानमध्ये (Pakistan) नक्की काय सुरू आहे सध्याच असाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे. गेल्या आठ महिन्यात दुसऱ्यांना तेथे अल्पसंख्यांक असणाऱ्या शीख समाजावर (Minoriti Sikh Community) हल्ला करण्यात आला आहे. तर आज दोन शीख भावांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे तेथे राजकारण तापलेले असतानाच आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister Imran Khan) यांच्यामुळे त्यात चिंता वाढली आहे. येथे पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. यावेळी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या हत्येची शक्यता व्यक्त केली आहे. इम्रान खान शनिवारी म्हणाले, माझ्या जीवाला धोका आहे. पाकिस्तानच्या आत आणि बाहेर काही लोक मला मारण्याच्या प्रयत्नात आहेत. मी त्या सर्व लोकांना ओळखतो. मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि तो सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे. जर मला मारले गेले तर या व्हिडिओतून या सर्व लोकांची नावे समोर येतील.
सियालकोटमध्ये पक्षाच्या रॅलीदरम्यान ते म्हणाले की, मला त्यांच्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी बंद खोल्यांमध्ये षड्यंत्र रचले जात आहेत. ज्या लोकांच्या मार्गात मी आहे त्यांची अशी इच्छा आहे की, इम्रान खान यांना मारले पाहिजे. मला या कटाची आधीच माहिती मिळाली आहे. त्यामुळे मी व्हिडिओ रेकॉर्ड करून सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे. या कटात कोण कोण सामील आहे हे संपूर्ण पाकिस्तानला कळावे अशी माझी इच्छा आहे.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, खान यांनी व्हिडिओ बनवण्यामागचे कारण स्पष्ट केले आणि सांगितले की, पाकिस्तानमध्ये शक्तिशाली लोकांना जबाबदार धरले जात नाही, त्यामुळे या व्हिडिओद्वारे ते देशहिताच्या विरोधात जाणाऱ्या सर्वांचा पर्दाफाश करतील.
आपल्या जीवाला धोका असल्याचे इम्रान खान यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. सत्तेतून हकालपट्टी होण्यापूर्वी त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सबळ पुरावे असल्याचेही सांगितले होते.
अविश्वास प्रस्तावापूर्वी इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावाही एका पाकिस्तानी मंत्र्याने केला होता. तर एप्रिल 2022 मध्ये देखील इम्रानने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गृहमंत्र्यांना इम्रान खानची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले होते.