न्यूयॉर्क | 14 डिसेंबर 2023 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मालमत्तेवर कर्ज देणाऱ्या बँकांशी खोटे बोलल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपावरून न्यूयॉर्क येथे त्यांच्यावर नागरी फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आलाय. 11आठवड्यांच्या सुनावणीनंतर आता या खटल्याचा निकाल जानेवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांनी हा खटला दाखल केला होता. या सुनावणी दरम्यान अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांनी ट्रम्प दोषी आढळल्यास सुमारे 2100 कोटींचा दंड करावा अशी मागणी केलीय. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जर या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांना किमान 250 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांनी केलीय. तसेच, ट्रम्प यांना न्यूयॉर्कमध्ये व्यवसाय करण्यावर काही निर्बंध असतील असे सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती आर्थर अँगोरॉन हे ट्रम्प यांच्याबाबत सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी करत आहेत. 11 जानेवारी रोजी या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद पूर्ण होईल त्यानंतर ते आपला निकाल देऊ शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील ख्रिस किसे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ही सुनावणी २ ऑक्टोबरपासून सुरू झाली. ती 11 आठवडे चालली. परंतु, त्यांच्या अशिलाविरुद्ध ठोस काही निष्पन्न झाले नाही. माजी राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या बँकर्ससोबत कोणतीही फसवणूक केली नाही. बँकांचे कोणतेही नुकसान केले नाही. आजही बँका त्यांना आपला महत्त्वाचा ग्राहक मानतात. तर दुसरीकडे अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांनी सुनावणीदरम्यान ट्रम्प यांची फसवणूक अधिक स्पष्ट झाली. ते आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असे सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प हे 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला दावा ठामपणे मांडत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून ट्रम्प यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, त्यांच्यावर दाखल असलेले खटले त्यांची पाठ सोडत नाहीत. आपल्यावरील आरोप खोटे आहेत. आपण काहीही चुकीचे केले नाही असे ट्रम्प म्हणत आहेत. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी गेल्या सुनावणीदरम्यान त्यांच्या आर्थिक कागदपत्रांमध्ये काही अनियमितता होती हे खरे आहे. परंतु, यामुळे बँकांचे कोणतेही नुकसान झाले नाही, अशी कबुली दिली होती.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतचे हे प्रकरण त्यांच्या राजकारणाच्याच नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे असे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणखी चार फौजदारी खटले दाखल आहेत. त्याचा निवडणूक प्रचारावरही परिणाम होत आहे. परंतु, रिपब्लिकन पक्षाचे दावेदार म्हणून ट्रम्प अजूनही त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच पुढे आहेत. एका सर्वेक्षणानुसार जो बिडेन यांच्यापेक्षा 61 टक्के रिपब्लिकनांनी ट्रम्प यांनाच मजबूत पर्याय म्हणून स्वीकारले आहे.