दोन दिवस म्हणजे 48 तास अमेरीकेनं श्वास रोखून धरला. कारण अमेरीकेतल्या टेक्सासमध्ये (Texas Hostage Drama) एका दहशतवाद्यानं मुंबईत जशी 26/11 ची घटना घडली होती तसच घडवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी एका प्रार्थनास्थळावर काही ज्यू जमलेले होते. त्याचवेळेस एका दहशतवाद्यानं चार जणांना ओलीस ठेवलं. हे सर्व जण ज्यू होते. ज्यू म्हटलं की श्रीमंत, लॉबिस्ट आणि इस्त्रायलपासून अमेरीकेपर्यंत ज्यांचा आर्थिक दरारा आहे अशी मंडळी. त्यांना ओलीस ठेवण्यामागेही दहशतवाद्याचा हाच उद्देश असावा. शेवटी दोन दिवसानंतर हा सगळा ड्रामा संपलाय. ज्यानं ओलीस ठेवलं होतं, त्याचा FBI च्या टीमनं खात्मा केलाय. त्याचं नाव आहे मलिक फैसल अक्रम (Malik Faisal Akram) आणि ज्या चार जणांना ओलीस ठेवलं होतं तेही सुरक्षित आहेत. पण जिच्यासाठी ह्या सगळ्या घडामोडी घडल्या ती आफिया सिद्दिकी पुन्हा एकदा चर्चेत आहे. फक्त आफियाच नाही तर पाकिस्तानचे दहशतवादी कनेक्शचीही पुन्हा एकदा जगभर चर्चा होतेय. कोण आहे ही आफिया सिद्दीकी?
कोण आहे आफिया सिद्दीकी?
आफिया सिद्दीकी (Aafia Siddiqui) एक नाही , दोन नाही तर 86 वर्षाची सजा भोगतेय. सध्या ती अमेरीकेतल्याच तुरुंगात आहे. 2010 साली तिला बेड्या ठोकल्या गेल्या. कारण आहे अमेरीकन सैनिकांचं हत्याकांड घडवण्याचा प्रयत्न. तेही अफगाणिस्तानमध्ये. त्याच आफिया सिद्दीकीला सोडण्याची मागणी करत अमेरीकेत 48 तासाचा ओलीस ड्रामा रंगला. दहशतवादी घडामोडींमध्ये अशिक्षित किंवा कमी शिकलेल्यांपेक्षा उच्च शिक्षित जास्त आहे हे पुन्हा एकदा आफिया सिद्दीकीच्या प्रोफाईलवरुन दिसून येतं. आफिया न्यूरो सायंटीस्ट आहे. वयाच्या 18 व्या वर्षी ती तिच्या भावाकडे अमेरीकेत गेली. तिथं बोस्टनला प्रतिष्ठीत अशा MIT मध्ये शिकली. नंतर तिनं ब्रँडीस विद्यापीठातून न्यूरो सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली. अमेरीकेत 9/11 घडलं आणि आफिया FBI च्या रडारवर आली. इस्लामिक संघटनसाठी तिने केलेले डोनेशन्स, 10 हजार डॉलर्सच्या नाईट व्हिजन गॉगल्सची खरेदीचा ठपका आफियावर ठेवण्यात आला. अमेरीकेत राहूनच तिनं अल कायदा ज्वाईन केल्याचे आरोप झाले. नंतर पाकिस्तानला आली तर तिनं खालिद शेख मोहम्मदच्या कुटुंबात लग्न केलं. हा तोच खालिद शेख होता ज्याला 9/11 च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधारापैंकी एक मानलं गेलं. ह्या सगळ्या संबंधावरुन आफियाला लेडी अल कायदा म्हटलं गेलं. अल कायदाशी ज्या पहिल्या काही महिला जोडल्या गेल्या त्यात आफिया सिद्दीकी टॉपवर आहे.
#UPDATE The man who held four people hostage at a Texas synagogue is identified by US authorities as a British citizen, while UK police later arrested two teens over an attack that President Joe Biden calls an “act of terror” https://t.co/G3QOWlSuKX pic.twitter.com/Y2Oxypatbh
— AFP News Agency (@AFP) January 17, 2022
आफिया अटकेत
जगभर चर्चेत असतानाच आफिया सिद्दीकी 2003 मध्ये गायब झाली. जवळपास 5 वर्षानंतर ती अफगाणिस्तानच्या गझनीमध्ये तिला अटक झाली. असं सांगितलं जातं की तिची चौकशी सुरु असतानाच तिनं रायफल हिसकावून घेतली आणि अमेरीकन सैनिकावर हल्ला केला. त्यात ती स्वत: जखमी झाली. अमेरीकन सैनिक जखमी झाले. तिच्या अटकेवर पाकिस्तानमध्ये मोठं वादळ उठलं. आफिया सिद्दीकीला 86 वर्षांची सजा सुनावण्यात आली. अल कायदानं त्याचा बदला घेण्याचं आवाहन मुस्लिमांना केलं. याआधीही पाकिस्तानमध्ये दोन वेळेस ओलीस नाट्य झालं, त्यावेळेसही आफिया सिद्दीकीला सोडवण्याची मागणी ओलीस ठेवणाऱ्यांनी केली होती.
टेक्सासमध्ये नेमकं काय घडलं?
चार ज्यूंना ओलीस ठेवल्यानंतर दहशतवाद्यानं त्याचं नाव मोहम्मद सिद्दीकी असल्याचं जाहीर केलं. त्यानं आफिया सिद्दीकीची भाऊ असून तिची सुटका करण्याची मागणी केली. दरम्यान अमेरीकन टीमनं आफियाशी संपर्क केला तर तिनं आपला असा कोणताही भाऊ नसल्याचं सांगितलं. एवढच नाही तर कुठल्याच कारणाने निष्पाप जीवांच्याविरोधा हिंसा करण्यालाही विरोध केल्याचं सांगितलं गेलं. दरम्यानच्या काळात चारपैकी 2 ज्यू मोहम्मद सिद्दीकीच्या तावडीतून सुटून जाण्यात यशस्वी झाले. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झालाय. शेवटी एफबीआयच्या टीमनं प्रार्थना स्थळात प्रवेश केला आणि राहीलेल्या दोन्ही ज्यूंची सुटका केली. ज्यानं ओलीस ठेवलं त्या दहशतवादी मोहम्मद सिद्दीकीचाही खात्मा करण्यात आला. नंतर तो मोहम्मद सिद्दीकी नसून मलिक फैसल अक्रम असल्याचं उघड झालं. तो ब्रिटीश नागरीक आहे.
आफियाला सोडवण्यासाठी फक्त अल कायदाच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानसह इतर अनेक नेत्यांनी प्रयत्न केलाय. पण वेळोवेळी अमेरीकेनं त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्यात. आताही टेक्सासमध्ये जी घटना घडली त्यामुळे पाकिस्तानचं पुन्हा एकदा दहशतवादी कनेक्शन जगासमोर आलंय. त्यामुळेही मोठी नाचक्की होतेय.
हे सुद्धा वाचा: