Gaza Israel conflict : लढा आता आणखी तीव्र होणार; इस्रायलच्या मदतीला अमेरिका, लढाऊ विमानं आणि युद्धनौका रवाना

| Updated on: Oct 09, 2023 | 11:41 AM

Israel Hamas War : दक्षिणी इस्रायलमध्ये मोठा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 5 तासात दुसरा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. इस्रायल आणि हमासच्या लढ्यात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. अमेरिका आता इस्रायलच्या पाठिशी उभी राहिली आहे. नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

Gaza Israel conflict : लढा आता आणखी तीव्र होणार; इस्रायलच्या मदतीला अमेरिका, लढाऊ विमानं आणि युद्धनौका रवाना
Follow us on

तेल अवीव | 9 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर हमास या कट्टरवादी संघटनेकडून हल्ला करण्यात आला. यात हजारो लोकांचा जीव गेला आहे. अशात आता इस्रायलच्या मदतीला अमेरिका धावून आली आहे. अमेरिकेकडून इस्रायलला मदत पुरवली जात आहे. लढाऊ विमानं आणि युद्धनौका अमेरिकेने इस्रायलसाठी पाठवली आहेत. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून यावर भाष्य करण्यात आलं आहे. फायटर जेट स्क्वाड्रनला चालना देण्यासाठी आम्ही USS गेराल्ड ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात पाठवत आहोत. जेणे करून इस्रायलला मदत होईल. लढाऊ जहाजं आणि विमानं आम्ही इस्रायलला पाठवत आहोत, असं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

शनिवारी अचानकपणे हमासकडून इस्रायलवर हल्ला करण्यात आला. यावेळी रॉकेट डागण्यात आली. त्यानंतर समुद्री मार्गाने आणि रस्ते मार्गाने घुसून इस्रायलच्या नागरिकांवर हल्ला करण्यात आला. यात 700 नागरिकांचा मृत्यू झाला. यात चार अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला. व्हाईट हाऊसकडून याची माहिती देण्यात आली. शिवाय या युद्धात आपण इस्रायलच्या सोबत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. शिवाय अन्य देशांनी या युद्धापासून दूर राहावं, असंही अमेरिकेने सुचवलं आहे.

इस्रायलवर झालेल्या या हल्ल्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. अशात अमेरिकेने ठोस पावलं उचलली आहेत. अमेरिकेचं कॉल साईन CLEAN01 यासह KC-10A एक्सटेंडर एअरक्राफ्ट तैनात करण्यात आली आहेत.

गेल्या 48 तासांपासून इस्रायल आणि हमासमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. या युद्धात आतापर्यंत 1 हजार 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर इस्रायलकडून हमासच्या 400 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला मोठा धक्का बसला. इस्रायलनेही जोरदार पलटवार केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्पष्टपणे हे युद्ध असल्याचं म्हटलं. सध्या युद्ध सुरु झालं आहे. आपण पूर्ण ताकदीने लढा देऊ, असं त्यांनी जाहीर केलं. आता इस्रायलची परिस्थिती पाहिल्यास ठिकठिकाणी जाळपोळ पाहायला मिळत आहे. लोकांचे मृतदेह पाहायला मिळत आहेत. आता अमेरिकेने मदत केल्याने इस्रायलला अधिक ताकद मिळाली आहे. या युद्धाकडे अवघ्या जगाचं लक्ष आहे.