बेरुत | 13 ऑक्टोबर 2023 : इस्रायलने गाझापट्टी खाली करण्यास सांगत मोठे युद्ध करण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलचे साडे तीन लाख सैनिक तयार असताना आता हमासच्या मदतीला दुसरी एक अतिरेकी संघटना हिजबुल्लाह धावली आहे. हमासने लेबनान सीमेवर नवी आघाडी उघडली आहे. लेबनानमधून इस्रायल सीमेवर गेल्या सात दिवसात अनेकदा गोळीबार झाला आहे. यामागे लेबनानमध्ये सक्रीय अतिरेकी संघटना हिजबुल्लाह असल्याचे म्हटले जात आहे. हिजबुल्लाह ही हमास साथीदार संघटना आहे. लेबनानकडून होत असलेल्या गोळीबाराला इस्रायलनेही उत्तर दिले आहे. या दरम्यान हिजबुल्लाहने वेळ आल्यास आम्ही हमासच्या बाजूने युद्धात उतरु असे म्हटले आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री लेबनानच्या दौऱ्यावर येताच काही दिवसात हिजबुल्लाहने हे वक्तव्य केले आहे.
हिजबुल्लाहचे उपप्रमुख नईम कासिम यांनी म्हटले आहे की त्यांचा गट इस्रायल आणि हमासदरम्यान सुरु असलेल्या संघर्षापासून वेगळ्या राहण्याच्या आवाहनाने प्रभावित झालेला नाही. हिजबुल्लाह युद्धात योगदान द्यायला संपूर्णपणे तयार आहे. त्यांनी दक्षिण बैरुतमध्ये एकत्र झालेल्या हिजबुल्लाह सर्मथकांच्या रॅलीत हे बोलताना हे आव्हान दिले आहे. मोठ्या शक्ती अरब देश, संयुक्त राष्ट्राचे दूत पडद्यामागून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात आम्हाला हस्तक्षेप करु नका असे म्हणत आहेत. परंतू याचा काही परिणाम होणार नाही. हिजबुल्लाह आपल्या कर्तव्याला जागणार आहे. आम्ही तयार आहोत,संपूर्ण सज्ज आहोत.
साल 2006 रोजी एक महिनाभर झालेल्या युद्धानंतर गेल्या आठवड्यात लेबनान सीमेवर इस्रायलशी भिडला आहे. परंतू हिजबुल्लाह आपले पत्ते अजून झाकून ठेवले आहेत. इस्रायलवर मोठा हल्ला केला तर इस्रायल लेबनानला नष्ट केल्याशिवाय थांबणार नाही हे हिजबुल्लाह जाणून आहे. लेबनान आधीच अस्थैर्य आणि आर्थिक संकटाशी झुंजत आहे. अशात जर अमेरिका किंवा इस्रायलने त्याच्यावर हल्ला केला तर त्याचीही अवस्था गाझापट्टीसारखी होईल हे हिजबुल्लाहला माहिती आहे.
हिजबुल्लाह काय करणार ? असा सर्वांच्या मनात प्रश्न आहे. असे सांगत कासिम यांनी म्हटले की आम्ही आमच्या योजनेनूसार या लढाईत योगदान देऊ. जेव्हा कारवाईची वेळ येईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. हे वक्तव्य त्यांनी पॅलेस्टिनींना पाठींबा देण्यासाठी दक्षिण आणि पूर्व लेबनान शहरात आयोजित केलेल्या रॅलित केले आहे. हा परिसर हिजबुल्लाह बालेकिल्ला मानला जातो. कोणता वेगळा झालेला गट सीमा पार करू शकतो म्हणून लेबनानच्या सैन्याने संपूर्ण दक्षिणेत गस्त वाढविली आहे.