हमास संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिये याच्या हत्येनंतरही शांत असलेला इराण हेजबोल्ला याच्या प्रमुख असलेल्या हसन नसरल्लाह याच्या हत्येनंतर मात्र पिसाळला आहे. इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर सुमारे 200 बॅलिस्टीक क्षेपणास्र डागली आहेत. यापैकी अनेक क्षेपणास्रांना हवेतच नष्ट करण्यात अमेरिका आणि इस्रायलला यश आले आहे. परंतू काही क्षेपणास्रं इस्रायलच्या सैनिक तळावर पडली आहेत. या हल्ल्यात एका इस्रायली नागरिकाचा मृत्यू देखील झाला आहे. आता इस्रायलने इराणला याची मोठी किंमत चुकवाली लागेल असा गर्भित इशारा दिला आहे. इराण आणि इस्रायल कधी काळी घनिष्ट मित्र होते. परंतू आता एकमेकांची पक्के शत्रू बनले आहेत.
इराण आणि इस्रायल यांच्यात इतकी दुश्मनी झाली आहे की इस्रायलला अस्तित्वात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे इराणचे म्हणणे आहे. इराण इस्रायल विरोधात अनेक देशांना एकत्र केले आहे. इराणने कधीकाळी इस्रायलच्या स्थापनेचे समर्थन केले होते असे साऊथ एशियन युनिव्हर्सिटीचे सहायक प्रोफेसर धनंजय त्रिपाटी यांनी म्हटले आहे.आता इराण इस्रायलला छोटा राक्षस तर अमेरिकेला मोठा राक्षस मानत आहे. इराणला इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना मध्य पूर्वेतून बाहेर काढायचे आहे.
इराण हेजबोला, हमास आणि हुथी बंडखोरांना फंडींग करत असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. या दोघांच्या दुश्मनीमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. 1979 मध्ये इस्लामिक क्रांती होईपर्यंत इस्रायल आणि इराणमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. तेव्हा इराणमध्ये राजेशाही होती. तेव्हा इराण अमेरिकेचा मुख्य साथीदार होता. साल 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाली तेव्हा इस्रायलचे समर्थन करणारा पहिला देश तुर्कस्थान होता, तर दुसरा देश इराण होता.
इस्रायलचे पहिले संस्थापक पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी आधी अरब देशांशी मैत्री करण्यासाठी आधी इराणशी संपर्क केला होता. कारण इस्रायल ज्यू देश असून संपूर्णपणे मुस्लीम देशांनी वेढलेला आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी अरब राष्ट्राशी मैत्रीचा प्रस्ताव इस्रायलने इराणद्वारे पाठवला होता. परंतू साल 1979 मध्ये आयातुल्ला खोमेनी यांनी राजाची सत्ता उलथवून लावली आणि स्वत:ला इराणचे रक्षक म्हणून घोषीत करीत मुस्लीम राज्याची स्थापना केली. खोमेनी यांनी इस्रायल आणि अमेरिकेविरोधात फूट टाकली. या संकटाच्या घेऱ्यात अन्य मुस्लीम देश देखील आले.
खोमेनी यांनी इस्रायलशी संबंध तोडले. आपल्या नागरिकांना पासपोर्ट जारी करणे देखील बंद केले. तेहराण येथील इस्रायलचा दुतावास बंद केला. आणि पॅलेस्टाईन मुक्ती संघटनकडे सोपिवला. तेव्हा स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठी इस्रायलविरोधात संघर्ष सुरु होता.
इस्रायल आणि इराणची मैत्री इतकी होती की खोमेनी यांच्या कटकारस्थानानंतरही इस्रायलने इराणसाठी इराकबरोबर युद्धात मदत केली. 22 सप्टेंबर 1980 रोजी सद्दाम हुसेन यांच्या सैन्याने इराणवर अचानक हल्ला केला होता. त्यावेळी इस्रायलने सर्वकाही विसरुन इराणला युद्ध साहित्य पुरविले होते. इराकच्या ओसिरक अणुऊर्जा रिएक्टरवर बॉम्बहल्ला करण्यासाठी युद्ध साहित्यच नाही तर विमान देखील इस्रायलनी पाठविले होते. साल 1990 पर्यंत इस्रायल इराणला दुश्मन मानत नव्हता. मात्र नंतर इराण अण्वस्र बनविण्याच्या मागे लागला त्यानंतर ते वेगळे झाले. इस्रायलला आपल्या शेजारील कोणत्याही देशाकडे अण्वस्र असणे परवडणारे नव्हते.