गाझापट्टी | 25 ऑक्टोबर 2023 : हमास आणि इस्रायल याचं युद्ध गेल्या 7 ऑक्टोबरपासून सुरु आहे. गाझातील एका तरूणीने तिच्या घरातून बनविलेला एक व्हिडीओ समाजमाध्यमावरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत बॅकग्राऊडला बॉम्बस्फोटांचा कानटळ्या बसणारा आवाज स्पष्ट ऐकायला येत आहे. इस्रायलवर हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा पॅलेस्टाईनच्या सर्वसामान्य लोकांना कसा त्रास भोगावा लागत आहे हे या धक्कादायक व्हिडीओतून पहायला मिळत आहे. या तरुणीने बाल्कनीतून युद्धाचे दाखवले भीषण रुप पाहून युद्धाचे परिणाम काय असतात याची कल्पना येते.
पॅलेस्टिनी पत्रकार प्लेस्तिया अलकद हीने आपल्या घरात व्हिडीओ बनवून सोमवारी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती सांगतेय की गाझापट्टीतील रहीवाशांची काय अवस्था आहे. ती पुढे सांगते की, त्यांचे शेजारी त्यांच्या अपार्टमेंटच्या एका भागात खिडकीपासून दूर हल्ल्यापासून वाचण्यासाठी लपले होते. ती म्हणते की, ‘मी परिस्थिती समजवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतू मला वाटते की तुम्ही ती ऐकू शकता.’
येथे पाहा व्हिडीओ –
या व्हिडीओमध्ये ही तरुणी पुढे म्हणते की, आम्ही आता घरात श्वास घेऊ शकत नाही. आठ तासानंतर अपडेट देताना तिने सांगितले की आता येथे वीज प्रवाह बंद आहे. इंटरनेट बंद पडले आहे. एक बॉम्ब आमच्या घरावर पडणारच होता, परंतू त्यातून आम्ही थोडक्यात बचावलो आहोत. मोबाईलच्या कॅमेऱ्याला तिने खिडकीत नेत तिने दाखविले की तिच्या समोरील इमारतीवर हल्ला झाला आहे. लोक रस्त्यावर एम्ब्युलन्सची मागणी करीत आहेत. परंतू तेथे एम्ब्युलन्स उपलब्ध नाही. केवळ लोकांच्या किंचाळ्यांचा आवाज रिकाम्या रस्त्यावर आहे.
त्यानंतर सायंकाळी 7 वाजता सोशल मिडीयावर प्लेस्तिया हीने सांगितले की ती तिच्या कुटुंबियांसोबत शेजाऱ्यांच्या घरात आहे. सर्वजण अंधारात रहात आहेत. कोणालाच माहिती नाही जगात काय चालू आहे. केवळ बॉम्बचे भयंकर आवाज येत आहेत. कोणालाच माहिती नाही कोणता बॉम्ब कुठे मृत्यू बनून कोणाच्या डोक्यावर पडेल. 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हमासने मोठा हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला करीत युद्ध सुरु केले आहे.