पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रदेशात जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक झाली होती. बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) हा हल्ला केला होता. या हल्ल्याने पाकिस्तानचे नाक कापल्या गेले. आमचे लष्कर आणि गुप्तहेर खाते जगात अग्रेसर असल्याचा पाकड्यांचा गर्व हरला गेला. आता या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान शहबाज शरिफ यांच्या सल्लागाराने असा दावा केल्यानंतर आता सर्वच मंत्रिमंडळ लाज वाचवण्यासाठी असा दावा करत फिरत आहेत. पण त्याने काहीच साध्य होणार नाही, कारण पाकिस्तान किती खोटारडा आहे, हे जागतिक मंचावर अनेकवेळा सिद्ध झाले आहे.
परराष्ट्र खात्याचे रडगाणे
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्या मदतीने बलूच लिबरेशन आर्मी हे हल्ले घडवत असल्याचा आरोप केला. तहरीक-ए-तालिबान या संघटनेला अफगाणिस्तान तालिबान सरकार आणि भारत मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला होता.
तर पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी सुद्धा हेच रडगाणे गायले. बीएलए बंडखोराना भारताचे पाठबळ असल्याचा दावा त्यांनी केला. अफगाणिस्तानमधून बंडखोरांना फोन येत असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. ट्रेन हायजॅक संबंधित कॉल अफगाणिस्तानातून करण्यात आल्याचा दावा खान यांनी केला. पाकिस्तानकडे सर्व पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी सुद्धा अशाच हल्ल्यात भारताचा हात असल्याचा पाकिस्तान सरकारने दावा केला होता. पण त्याचे पुरावे देण्यात त्यांचे हात कोणी बांधले, तेच समोर आलेले नाही. जागतिक मंचावर पाकिस्तान खोटारडा असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. तर पाकिस्तानमध्येच दहशतवादी प्रशिक्षण छावण्या असल्याचे समोर आले आहे. लष्कर आणि गुप्तहेर संघटना आयएसआय त्यासाठी मोठी रसद पुरवत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत.
11 मार्च रोजी ट्रेन हायजॅक
मंगळवारी जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली होती. राजकीय कैदी, नागरिक, कार्यकर्ते यांची सुटका करण्याची अट बीएलएने ठेवली होती. या ट्रेनमध्ये 450 प्रवाशी होते. हल्ल्यात 58 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 33 बंडखोरांचा समावेश आहे. तर 21 प्रवाशांमध्ये लष्कराचे जवान, अधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान तालिबानने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. दुसर्या देशांवर आरोप करण्यापूर्वी एकदा शहानिशा करा. तुमच्या अंतर्गत सुरक्षेवर लक्ष द्या असा दणका अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने दिला आहे. तर भारताने पाकिस्तानचे चांगलेच कान टोचले आहेत.