नासाची भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे साथीदार बुच विल्मोर हे गेल्या एका महिन्याहून अधिक काळापासून अंतराळात अडकले आहेत. हे दोघेही बोइंग स्टारलायनर कॅप्सूलद्वारे अंतराळात गेले होते, परंतु अंतराळ यानामध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे ते अद्याप पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत. सुनीता विल्यम्स आणि तिचे साथीदार पृथ्वीवर यशस्वीपणे परत कधी येऊ शकतील आणि त्यांना सर्वात जास्त धोका असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत ? असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे.
5 जून रोजी फ्लोरिडा येथून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे अंतराळात रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे मिशन देखील केवळ 7 दिवसांचे होते, परंतु त्यांना आता तेथे जाऊन एक महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंतराळवीर सुनीता विल्यम्स विल्मोरसोबत यांच्या यशस्वी परतीसाठी नासा सतत प्रयत्न करत आहे. बोइंग स्टारलायनरचे हे पहिले उड्डाण होते. हेलियम गळती आणि थ्रस्टर खराब झाल्यामुळे परतीचे मिशन पुढे ढकलण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. सुनीता सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहे. पण त्या पूर्णपणे सुरक्षइत आहेत, असे नाही. अंतराळात त्यांना कोणत्या गोष्टींचा धोका आहे, ते जाणून घेऊया.
काय आहे धोका ?
सुनीता आणि विल्मोर हे दोघे 7 दिवसांच्या मिशनवर गेले. मात्र तांत्रिक बिघाडामुळे परिस्थिती बदलली असून ते आता 40 दिवसांपेक्षा जास्त काळ अंतराळातच आहेत. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, रेडिएशनचा धोका, अवकाश स्थानकांचे मर्यादित भाग ही त्यांच्यासमोरची मोठी आव्हाने आहेत. इतकंच नाही तर अंतराळ स्थानकावर जास्त वेळ राहिल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तेथे गुरुत्वाकर्षण नसल्याने शरीरातील द्रव पदार्थ शरीराच्या वरच्या भागात पोहोचू लागतात, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येणे, नाक बंद होणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रक्ताचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
कॅन्सरचाही धोका
एवढंच नव्हे तर अंतराळवीरांना पृथ्वीच्या तुलनेत जास्त प्रमाणात किरणोत्सर्गाचा (रेडिएशनचा) सामना करावा लागतो. यामध्ये गॅलेक्टिक कॉस्मिक किरण आणि सौर कणांचाही समावेश असतो. यामुळे डीएनए क्षती होण्याचा धोका निर्माण होतो तसेच कॅन्सरची शक्यता वाढते. अंतराळ संस्था रेडिएशनच्या पातळीचे काळजीपूर्वक निरीक्षण करत असतात. गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने संवेदी इनपुटवर परिणाम करतो. यामुळे संतुलन आणि डोळ्यांचे व हातांचा समन्वय राखणे यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. जेव्हा एखादा अंतराळवीर पहिल्यांदा अवकाशात जातो, तेव्हा त्याला मोशन सिकनेस जाणवू शकतो.
पृथ्वीवर कधी होणार पुनरागमन ?
सुनीता विल्यम्स आणि बुट विल्मर, हे दोघे पृथ्वीवर कधी परत येणार? हा एकच प्रश्न जगभरातील बहुतांश लोकांच्या मनात आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणत्याही अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यात सुनीता विल्यम्स आणि बुच यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशनवरुन पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. आणि बोइंग स्टारलायनर कॅप्सूल त्यांना पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित घेऊन येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अपयशी होण्याचा प्रश्नच नाही असं विल्मोर म्हणाले