हमासचा म्होरक्या इस्माईल हनिये यांची इराणच्या राजधानी तेहरानमध्ये 31 जुलै रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येने संतापलेल्या इराणने इस्रायलला धडा शिकविण्याची शपथ घेतली होती. आणि आता इराण या हत्येचा नक्की बदला घेऊ शकतो आणि केव्हाही युद्धाचा भडका होऊ शकतो असे म्हटले जात होते. इराण आणि हेजबोला यांच्या धमक्यांनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटी ब्लिंकन यांनी देखील युद्ध केव्हाही भडकू शकते असा इशारा दिला होता. परंतू इराण आणि लेबनॉन यांच्या धमक्यांना भीक न घालता इस्रायलने हेजबोलाच्या अनेक तळांवर हल्ले करुन ते उद्धवस्त केले आहेत.
इस्रायलच्या उत्तर सीमेवरील लेबनॉन या देशातील हेजबोला ही दहशतवादी संघटना आहे. इस्रायलचे पंतप्रधान यांची सत्ता बळकट करण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती पथ्यावर पडणारी असल्याने इस्रायलच्या सैन्याने इराणच्या राजधानी तेहराण येथे हमासचे तुलनेने मवाळ नेते असलेल्या इस्माईल हेनिया यांची कडेकोट निवासस्थान असलेल्या फ्लॅटमध्ये बॉम्बस्फोट करून हत्या केली आहे. त्यामुळे तेलसंपन्न असलेल्या आखातात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या हत्याकांडाच्या एक दिवस आधी लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हेजबोलाचा प्रमुख सैन्य कमांडर फऊद शुकर याची हत्या करण्यात आली होती. गाझापट्टीतील हमास संघटनेचा प्रमुख असलेला इस्माईल हेनिया हा इराणच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथग्रहण समारंभात सामील होण्यासाठी तेहराणला गेला होता. राष्ट्राध्यक्ष यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही किमी अंतरावरील सुरक्षा असलेल्या इमारतीत हमास प्रमुख इस्माईल हेनिया उतरला होता. तरीही त्याची हत्या घडविण्यात इस्रायल यशस्वी झाल्याने इराण वेडापिसा झाला आहे.
हेजबोला देखील आता इस्रायलवर हल्ला करणार असे म्हटले जात होते. हेजबोलाने गेल्या शनिवारी इस्रायलवर 50 रॉकेट हल्ले केले होते, परंतू इस्रायलच्या आयरन डोम क्षेपणास्र संरक्षण प्रणालीने हे हल्ले नाकाम ठरविले. इराण आणि हेजबोलात मध्य पूर्वेत मोठे युद्ध होणार असे म्हटले जात असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आपात्कालिन बैठक बोलावली होती. पेंटागनने यापुढील परिस्थिती पाहून या क्षेत्रात अतिरिक्त सैन्यदल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.