इराण आणि इस्रायल हे दोन देश सध्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. काल इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. 180 हून अधिक क्षेपणास्त्र इराणने इस्रायलवर डागली. तर या क्षेपणास्त्र हल्ल्याला जशास तसं उत्तर देऊ, असं इस्रायलने म्हटलं आहे. यामुळे सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जेव्हा इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली तेव्हा तिथली स्थिती काय होती? याबाबत इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली. यात त्यांनी क्षेपणास्त्र हल्ल्यावेळची परिस्थिती सांगितली. क्षेपणास्त्र हल्ल्यावेळी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जात आसरा घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
इराणने इस्रायल देशावर 180 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर जगभरात घबराट पसरली. त्यानंतर आता इस्रायलकडूनही जशाच तसं उत्तर देण्याची तयारी सुरु झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला इशारा दिला आहे. इस्रायलमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी हल्ल्यावेळची तिथली स्थिती सांगितली. जेव्हा हल्ला झाला तेव्हा आम्ही सुरक्षित ठिकाणी गेलो. तिथंच अर्धा तास थांबून होतो, असं इस्रायलमध्ये असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याने सांगितलं.
जेव्हा सायरन वाजतो तेव्हा आम्हाला क्षेपणास्त्र कुठे पडणार आहे? याची आम्हाला सूचना मिळते. तेव्हा इस्रायलचे लोक बॉम्ब शेल्टरमध्ये लपतात. तेल अवीवच्या आसपास येरूशलममध्ये दोन क्षेपणास्त्र डागली गेली. अर्धा तास बॉम्ब शेल्टरमध्ये थांबलो. त्यानंतर सायरन वाजला तेव्हा आम्हाला सुरक्षित असल्याचं कळवण्यात आलं. त्यानंतर आम्ही बॉम्ब शेल्टरमधून बाहेर आलो, असंही या विद्यार्थ्याने एका मुलाखतीत सांगितलं.
आम्हाला इथं असं कळतं आहे की सगळ्या क्षेपणास्त्रांना रोखलं गेलं आहे. तेल अवीवमध्ये काही अनुचित घटना घडल्या आहेत. तेल अवीवमध्ये भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. पण जेव्हा सायरन वाजला तेव्हा लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचले. जेव्हा सायरन वाजतो तेव्हा बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्यासाठी आम्हाला एक ते दीड मिनिटांचा वेळ मिळतो. या वेळेत सुरक्षित ठिकाणी गेल्यास जीविताला हानी पोहचत नाही, असं या भारतीय विद्यार्थ्याने एका मुलाखतीत सांगितलं.