इस्रायलवर इराणने 1 ऑक्टोबर रोजी 200 मिसाईल डागली होती, त्यानंतर इस्रायल इराणच्या विरोधात कोणते पाऊल उचलतो याकडे जगाचे लक्ष लागले आहे.परंतू इस्रायल सध्या लेबनॉन आणि गाझापट्टीतच खिंड लढवत आहे. हमासने तर युद्धविराम करण्याची तयारी दाखविली आहे. परंतू हे युद्ध आता एका वेगळ्या वळणावर उभे आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार जर इराणने इस्रायलवर 1 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याच्या बदल्यात इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला तर त्याला काय प्रतिकार करायचा याची तयारी इराण करत आहे. बातमीनुसार इराणच्या चार अधिकाऱ्यांच्या मते अयातुल्लाह खामेनेई यांनी सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले आहे. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा. आणि जर इस्रायलने इराण हल्ला केला तर कोणता प्लान अंमलात आणायचा याची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही देशात मोठे युद्ध झाले तर तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यातील इराणच्या सैन्यातील दोन अधिकारी आहेत. त्यांच्या मते जर इस्रायलने इराणच्या आण्विक ठिकाणांवर तसेच तेलाच्या साठ्यांवर हल्ला केला तर युद्ध थांबणार नाही. इराण या युद्धाला वेगळ्या पातळीवर नेऊ शकतो. याच्या झळा संपूर्ण मध्य पूर्वेला बसतील. इराणच्या वतीने बॅलेस्टीक मिसाईलचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. जर इस्रायलने कोणताही हल्ला केला तर 1000 बॅलेस्टीक मिसाईल त्यांच्या डागली जातील. 1 ऑक्टोबर रोजी इराणने 200 मिसाईल डागली होती. अमेरिकेसह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. जर हे युद्ध या पातळीवर पोहचले तर तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग देखील बाधित होईल. तर इराण असाही विचार करीत आहे की जर इस्रायलने त्यांच्या सैन्य ठिकाणांवरच हल्ला केला चर मोठी कारवाई टाळायची का ? अशावेळी इराण थेट हल्ला करणार नाही असे म्हटले जात आहे. त्यामुळे दोन मोठ्या ताकदीतील थेट युद्ध थांबू शकेल असे म्हटले जात आहे. यापूर्वी चर्चा होती की इस्रायल इराणच्या तेल साठे आणि आण्विक ठिकाणांवर टार्गेट करु शकतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणचा बदला घेतला जाईल अशी थेट धमकी दिली होती. खास करुन इराणच्या संवेदनशील ठिकाणांवर हल्ले होऊ शकतात असे इस्रालयने सुतोवाच केले होते.
आम्हाला या क्षेत्रात युद्ध आणि अस्थिरता नको आहे असे इराणचे नेते म्हणत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी अनेकदा असे म्हटलेले आहे. परंतू इराणला असेही वाटतंय की यातून हा संदेश जाऊ नये की इराण बॅकपूटवर गेला आहे आणि इस्रायलच्या तुलनेत बचावात्मक झाला आहे. हेच कारण आहे की इराण आक्रमक देखील बनत आहे. परंतू थेट कोणत्याही मोठ्या युद्धात उतरण्यापासून स्वत:ला वाचवत आहे.