बगदाद | 27 सप्टेंबर 2023 : उत्तर इराकमधील (Iraq) नेवेह प्रांतातील मंगळवारी एका लग्नसमारंभादरम्यान भीषण दुर्घटना घडली. या समारंभादरम्यान लागलेल्या आगीत (fire at wedding) 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर किमान 150 जण जखमी झाले आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली तो भाग राजधानी गदादच्या वायव्येस सुमारे 335 किलोमीटर (205 मैल) अंतरावर आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण प्राथमिक माहितानुसार, फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे वृत्त न्यूज एजन्सीजनी दिले आहे. काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आगीचे भीषण रूप दिसत असून त्यामुळे जळालेल्या भागांचे अवशेषही दिसत आहेत. पोलीस अधिकारी, वैद्यकीय पथकाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जाव यांच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे.
लग्नाच्या आनंदाचा क्षणभरात दु:खात रुपांतर
इमारतीमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इराक नागरी संरक्षण संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या आगीमुळे हॉलचा काही भाग क्षणभरात पेटला आणि एकच गोंधळ निर्माण झाला. लग्नमंडपाचा बाहेरील भाग अत्यंत ज्वलनशील आवरणाने सजवण्यात आला होता, जे खरंतर बेकायदेशीर आहे. मात्र याच भागाने बघता बघता पेट घेतला आणि आगीने सर्वत्र रौद्र रुप धारण केले.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, 10:45 च्या सुमारास ही आग लागली. तेव्हा हॉलमध्ये शेकडो लोक उपस्थित होते आणि लग्नानिमित्त जल्लोष करत होते. या दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मात्र मृतांचा अंतिम आकडा अद्याप समोर आला नसून ही संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना उपचारांसाठी प्रादेशिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
आगीच्या चौकशीचे आदेश
आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, या दुर्दैवी अपघातामुळे प्रभावित झालेल्यांना मदत दिली जाईल. पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले आणि देशाच्या अंतर्गत आणि आरोग्य अधिकाऱ्यांना मदत करण्याचेही आदेश दिले आहेत.