हमास प्रमुख इस्माईल हानिया याच्या मृत्यूने जगभर खळबळ उडाली आहे. इराणमध्ये एका हल्ल्यात हानिया ठार झाले. सुरक्षित गडात हानियावर हल्ला झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याने इराणमध्ये इस्त्राईल सक्रिय असल्याचे दिसून आले. हानिया इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांच्या शपथविधी कार्यक्रमात राजधानी तेहरानमध्ये पोहचले होते. अर्थात त्यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. पण या हल्ल्यामागे इस्त्राईल असल्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. हानिया यांच्या मृत्यूमुळे हमासला मोठे खिंडार पडले आहे. गेल्या 24 तासांत हमासचे दोन म्होरके ठार झाले आहेत. त्यामुळे इस्त्राईलला धडा शिकवण्याचा इरादा बोलून दाखवला.
बदला घेण्याची धमकी
हमासने त्याच्या प्रमुखाच्या मृत्यूवर तातडीने प्रतिक्रिया नोंदवली. हमास शी संबंधित शेहब ने याविषयीचे वृत्त दिले आहे. हमासचे अधिकारी मौसा अबू मरजौक यांनी हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इस्माईल हानिया यांच्या या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे इस्त्राईल आणि हमासमधील युद्ध तुर्तास थांबण्याचे कोणतेही चिन्ह नाहीत.
या हल्ल्यामागे इस्त्राईलच
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने बुधवारी तेहरानमध्ये हानिया यांच्या मृ्त्यूचा खुलासा केला. या हल्ल्यामागे इस्त्राईलच असल्याचा दावा हमासने केला आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्राईलच्या सीमावर्ती भागात अचानक हल्ला केला होता. त्यात 1200 नागरिकांचा मृत्यू ओढावला. तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. तेव्हापासून हमास आणि इस्त्राईलमध्ये संघर्ष उडालेला आहे. इस्त्राईलने गाझा पट्टीत मोठे नुकसान केले आहे. हमासचे तळघरे उद्धवस्त केली आहे. तर त्यांच्या प्रमुख नेत्यांना यमसदनी पाठवले आहे. पण या कारवाईत लाखो सामान्य नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात अनेक पॅलेस्टाईन नागरिकांचा नाहक बळी गेला आहे.
चार वर्षांपासून कतारमध्ये
हानिया यांनी 2019 मध्ये गाझा पट्टी सोडली आणि ते कतार या देशात स्थायिक झाले. हमासचा प्रमुख येह्या सिनवार यानेच 7 ऑक्टोबर रोजीच्या हल्ल्याचा कट रचला होता. यापूर्वी एप्रिल महिन्यात सुद्धा हानियाच्या कुटुंबावर इस्त्राईलने हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात हानियाचे तीन मुलं आणि नातू ठार झाले होते. काही दिवसांपूर्वी हानिया यांनी इस्त्राईलच्या आतापर्यंतच्या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील 60 सदस्य ठार झाल्याचा आरोप केला होता. या युद्धात आतापर्यंत 38 हजार नागरिकांचा बळी गेला आहे.