जेरुसलेम | 16 नोव्हेंबर 2023 : हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर नृशंस हल्ला केल्यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाला महिना होऊन गेला आहे. या युद्धात 12 हजाराहून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने गाझापट्टीत मैदानी लढाईला सुरुवात केली आहे. हमासच्या अतिरेक्यांच्या खात्मा करण्यास इस्रायलने सुरुवात केली आहे. उत्तर गाझापट्टीला बेचिराख केल्यानंतर इस्रायलने त्याच्यावर कब्जा केला आहे. आता इस्रायलच्या सैन्याने तेथील अल शिफा या मोठ्या हॉस्पिटलची झडती सुरु केली आहे. या हॉस्पिटलचा वापर हमासने आपले सेंटर म्हणून केल्याचा इस्रायलचा दावा आहे.
गाझापट्टीतील अल शिफा हॉस्पिटलची झडती घेताना इस्रायलच्या सैन्याला तेथे दारुगोळा सापडला आहे. येथे मोठ्या प्रमाणात शस्रसाठा सापडल्याने आता या हॉस्पिटलवरच बुलडोझर चालविण्याची तयारी इस्रायलच्या सैन्याने केली आहे. या हॉस्पिटलच्या खालून भूयार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
हमासने कोणाला संशय येऊ नये म्हणून अल शिफा या सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या खाली भूयार खणून तेथे कमांड सेंटर उभारल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. अमेरिकेने देखील इस्रायलच्या या वृत्ताला दुजोरा दिला असून आपल्या गुप्तचर यंत्रणेचे देखील हेच म्हणणे असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे हमास या वृत्ताचे खंडन केले आहे.
दुसरीकडे इस्रायलने हॉस्पिटलच्या चारीबाजूंनी बुलडोझर तैनात केल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केला आहे. हे धोकादायक असल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. युएनच्या ( संयुक्त राष्ट्र संघ ) म्हणण्यानूसार अजूनही या अल शिफा हॉस्पिटलमध्ये 2300 पेक्षा अधिक रुग्ण, कर्मचारी आणि विस्थापित नागरिक आहेत. ज्यात अनेक नवजात बालकांचाही समावेश आहे.
इस्रायलच्या मोठ्या कारवाईनंतर आता पॅलेस्टाईनने भारताकडे मदत मागितली आहे. पॅलेस्टाईनने म्हटले आहे की भारत एक शक्तीशाली देश आहे. त्याने जर सांगितले तर इस्रायल भारताचे ऐकेल. भारतातील पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान अबू यांनी म्हटले आहे की महात्मा गांधी यांच्यानंतर भारताने नेहमीच पॅलेस्टाईनच्या मुद्द्यास पाठिंबा देत या क्षेत्रात शांती स्थापित करण्यास सहकार्य केले आहे.