नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर चवताळलेल्या इस्रायलने आता गाझा पट्टीवर जमिनी युद्धासाठी मोठी तयारी सुरु केली आहे. इस्रायली एअर फोर्स हमासच्या केंद्रांना लक्ष्य करुन निकामी करीत आहे. इस्रायलने तीन लाखाची रिझर्व्ह फोर्स तयार केली आहे. इस्रायलने गाझा सीमेजवळ आपले सैनिक, रणगाडे आणि युद्धसामुग्री तैनात केली आहे. गाझातून येणाऱ्या फोटोमध्ये रणगाडे तोफांचा मारा करताना दिसत आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनूसार इस्रायलच्या पायदळ सैनिकांनी हमासवर हल्ला करण्यासाठी आगेकूच केली आहे. इस्रायलने आधी उत्तर गाझामध्ये राहणाऱ्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दक्षिण गाझाकडे जाण्याचा इशारा दिला होता. इस्रायली सैन्याने उत्तर गाझाच्या लोकांना सांगितले होते की जर तुम्ही स्वत:चा आणि कुटुंबांची काळजी करीत असाल तर दक्षिण गाजाच्या दिशे चालते व्हावे, हमासचे नेते केवळ स्वत:ची काळजी घेत असून हल्ल्याच्या भीतीने लपले आहेत.
न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीप्रमाणे संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी इस्रायलने गाझापट्टीच्या लोकांना दिलेल्या या धमकीला पुनर्विचार करण्याचा सल्ला देत हे पाऊल खूपच धोकादायक आणि चिंतेत टाकणारे असल्याचे म्हटले होते. हमासचे अतिरेकी गाझात नागरिकांना बंदी बनवित असल्याचे इस्रायल सुरक्षा दलाचे म्हणणे आहे.
इस्रायल डीफेन्स फोर्सने शनिवारी ( 14 ऑक्टोबर ) दिलेल्या माहितीनूसार इस्रायलवर हमासने केलेल्या अतिरेकी हल्ल्यात 1,300 जणांचा जीव गेला आणि 3000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हमासचे अतिरेकी गाझा शहराच्या भुयारांमध्ये लपून बसले आहेत. इस्रायलच्या बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी इस्रायलचे पायदळ गाझा पट्टीत शिरले असून आधी इस्रायलच्या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात येणार असल्याचे इस्रायल डीफेन्स फोर्सने म्हटले आहे.