इस्रायलने हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा खात्मा केल्यानंतर आता इस्रायल इराणवर मोठा हल्ला करण्याच्या बेतात आहे. अमेरिकेच्या पेंटागनमधून लीक झालेल्या अमेरिकेच्या गुप्त विभागाच्या दस्ताएवजानंतर ही जगभर खळबळ उडाली आहे.मध्य पूर्वेत अनेक ठिकाणांवर इस्रायलचे युद्ध सुरु आहे. गाझापट्टी आणि दक्षिण लेबनॉनवर मोठा हल्ला केल्यानंतर आता इराणवर मोठा हल्ला करण्याची इस्रायलची योजना आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.
इस्रायलने हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा खात्मा केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी दावा केला आहे की हमास संपलेला नाही. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर इराणने ड्रोन हल्ला केल्यानंतर आता इस्रायलचे पुढचे टार्गेट इराण असणार यात कोणतीही शंका नसल्याचे म्हटले जात आहे.
इराणच्या विरोधात इस्रायल करत असलेल्या हल्ल्याच्या योजनेची कागदपत्रे लीक झाल्याने खळबळ उडाली आहे.हे वृ्त्त पसरल्यानंतर जगभर खळबळ उडाली आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार अंमेरिकन गुप्त एजन्सीचे दोन अत्यंत गोपनीय दस्ताएवज लीक झाले आहेत. यात इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याच्या सैन्य तयारीविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे.
अमेरिकेने ही गुप्त माहिती लीक झाल्या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. पेंटागनच्या फाईव्ह आईज संबंधी माहिती लीक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. 15 आणि 16 ऑक्टोबरच्या तारखेचे हे गुप्त दस्ताएवज इराणशी संबंधीत एका टेलिग्राम अकाऊंट ‘मिडल ईस्ट स्पेक्टेटर’वर पब्लिश झाले आहेत. टॉप सीक्रेट म्हणून क्लासीफाईड असे या कागदपत्रांवर निशाण आहेत. हे दस्ताऐवज केवळ अमेरिका आणि त्याचे फाईव्ह आईज ( अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि ब्रिटन ) यांच्याकडेच हवेत असे त्यात म्हटले आहे.
एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की कथित पेंटागन कागदपत्रं आणि त्यांच्या लीक होण्याने एफबीआय देखील तत्पर झाली आहे. परंतू एफबीआयने या संदर्भात काहीही वक्तव्य केलेले नाही. प्राथमिक तपासानुसार काही कनिष्ठ स्तरावरील अमेरिकन अधिकाऱ्यांच्या पातळीवरुन हे कागदपत्रं लीक झाली असावीत असे म्हटले जात आहे.या गोपनीय कागद पत्रांच्या लीक झाल्याने अमेरिका आणि इस्रायल संबंधावर देखील परिणाम होऊ शकतो असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
या कागदपत्रांत इराण वरील संभाव्य हल्ल्याची योजना, इस्रायल सैन्याची तयारी, हवेतून हवेत इंधन भरण्याची मोहीम, शोध आणि बचाव मोहीम आणि संभाव्य इराणच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी मिसाईल सिस्टीमची तैनाती याची माहिती दिलेली आहे. नॅशनल जियोस्पेशियल-इंटेलिजिन्स एजन्सीच्या वतीने सॅटेलाईट फोटो आधारे हा दावा करण्यात आला होता. यात शस्रास्र आणि दारुगोळा स्थलांतरीत करण्याचाही उल्लेख आहे. दुसरी कागदपत्रात इस्रायलच्या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलसंबंधी इस्रायलच्या वायू सेनेच्या अभ्यासाविषयी माहिती दिली आहे. परंतू इराणविरोधात इस्रायल अण्वस्र वापरणार का याचा उलगडा या कागदपत्रांवरुन झालेला नाही.