गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला करीत अनेक लोकांना मारले तर काहींना ओलीस ठेवले. या ओलिसात एक अमित सौसाना देखील सामील होती. सुट्टीच्या दिवशी घरी बसलेल्या सौसाना हीला काही कल्पना नव्हती की तिच्या घराची अवस्था अतिरेकी अशी करतील आणि तिला ताब्यात घेतील. तिने आपल्यावरील अत्याचाराचा पाढा थेट युएनच्या कार्यालयात सर्वांसमोर वाचला आहे. तिच्यावरील अन्यायाची कहाणी ऐकून कोणालाही धक्का बसेल.
7 ऑक्टोबर रोजी अचानक गाझातून मिसाईल हल्ला झाला. सौसाना हीच्या घरातच बॉम्ब फुटला, त्यानंतर अतिरेकी तिच्या घरात घुसले आणि त्यांनी तिला फरफटत आपल्या सोबत गाझापट्टीत नेले. तिच्या खाजगी भागाला स्पर्श करण्यात आला.नंतर तिचा लैंगिक छळ करण्यात आला. अनेक हालअपेष्टा नंतर युद्ध थांबल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली. आता सौसाना हीची नरकायातनातून सुटका झाली आहे. आणि आपल्या लोकांमध्ये परतली आहे. तिने अलिकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला तेव्हा तेथे उपस्थित लोक हळहळले.
तिला हमासच्या राक्षसांसारख्या दिसणाऱ्या अतिरेक्याच्या ताब्यात एकटीला ठेवले होते. त्या अतिरेक्याने क्रुरतेच्या सगळ्या सीमा पार करीत तिचे शोषण केले. बंदुकीच्या धाकावर तिच्याशी सर्व काही केले. तो अतिरेकी तिच्या चेहऱ्यांवर फुंकर मारायचा. तिचे शर्ट उचलायचा आणि तिला वारंवार स्पर्श करायचा.
माझे पाय साखळीने बांधलेले होते. तो अतिरेकी नग्नावस्थेत माझ्या शेजारी बसायचा. माझे शर्टवर करुन मला स्पर्श करायचा आणि विचारायचा माझा पीरियड कधी संपणार आहे. मला माहिती होते त्याला काय करायचे आहे. परंतू त्यानंतर ही मी त्याला काही करु शकत नव्हते.त्याच्या दुष्कृत्यानंतर मला रडायचा आणि दु:खी होण्याचाही अधिकार नव्हता.मला त्या राक्षसासोबत चांगले वागायचे होते. जो मला त्रास देत होता असेही सौसान हीने म्हटले आहे. टाईम्स ऑफ इजराइलच्या बातमीत हा वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे.
‘युएन’ मध्ये आपली आपबिती सांगताना सौसाना हीने सांगितले की आज देखील असा एक दिवस जात नाही की त्या अतिरेक्याने माझ्यासोबत काय केले ते मला आठवत नाही…नंतर मी भानावर येते की आता मी स्वतंत्र आहे. आता मला तो काही करु शकत नाही. त्यानंतर त्या अतिरेक्याने मला दुसऱ्या अतिरेक्याकडे पाठवले, त्यांनी ही मला छळले आणि रस्सीने लटकवले आणि मारले. एका भुयारात आपल्याला नेले. मला वाटले तिथे मला जीवंत गाडले जाणार आहे. पण तेथे निदान तो लैंगिक शोषण करणारा अतिरेकी तरी नव्हता असे तिने सांगितले.