त्यानं अखेरचा श्वास घेतला तेव्हा भोवती होते फक्त काही पक्ष्यांचे पंख. The world’s loneliest man. जगातला सर्वात एकाकी माणूस. नुकताच वारला. वारला हे माणसांच्या जगात म्हटलं जातं. आपल्याकडे मेला म्हणत नाहीत. पण भाषेतला, शब्दातला कमी-जास्त पणा त्याने कधी अनुभवलाच नाही. शब्दांच्या जादूवर जगण्याचा मोह त्याला शिवलाही नाही. तो आदिवासी होता. आदिमानव होता. सर्वात दुर्मिळ तामोरु जमातीचा. त्याच्या भोवतीची 6-7 माणसं आपल्यातल्याच हिंस्र पशुंनी मारली. मागच्या 26 वर्षांपासून तो एकटाच रहात होता. ब्राझीलमधल्या (Brazil) अॅमेझॉन (Amazon Jungle) जंगलात. काही दिवसांपूर्वीच त्याचं शव जंगलातल्या झुल्यात लटकलेलं आढळलं. भोवती होते ब्राझीलियन पक्ष्याचे पंख. तेच त्याच्या अखेरच्या क्षणांचे साथीदार.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ब्राझीलमधील इंडोजिनियस प्रोटेक्शन एजन्सी फ्युनाईला 23 ऑगस्ट रोजी या माणसाचा मृतदेह आढळला. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं दिसून आलं. कारण मृत्यू टाळण्यासाठी त्यानं कोणतेही प्रयत्न केल्याच्या खुणा दिसल्या नाहीत. तो मृत्यूची वाट पहात होता का? माहिती नाही. त्याच्या भोवतीची सहा-सात माणसं आपण मारली. पण त्या आधीची माणसं कशी गेली, याचा कुणालाच पत्ता नाही. ब्राझीलमध्ये अशा अनेक प्रजाती आहेत असं म्हटलं जातं. मात्र संपर्कात नसलेल्या आदिमानवाचा मृत्यू पहिल्यांदा प्रकाशात आलाय.
फ्युनाईच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 1996 मध्ये या माणसाशी भेटण्याचा प्रयत्न झाला होता. तो त्याच्या झोपडीत लपला. संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो खूप आक्रमक झाला होता. घाबरला. आक्रमक, आक्रस्ताळा झाला. त्यानंतर संस्थेनं त्याला त्याच्या स्थितीवर सोडण्याचा निर्णय घेतला.
अनेकदा हेलिकॉप्टरमधून, दुर्बिणीनं निरीक्षण केल्यानंतर ब्राझीलमधील या संस्थेनं या माणसाचं मॅन ऑफ द होल असं नाव ठेवलं. यामागचं कारणही तसंच आहे. हा माणूस जमिनीत 10 फूटांचे खड्डे करून ठेवायचा. तो इतर आदिवासींसारखेच भांडी वापरत होता. मात्र खड्डे ही त्याची वेगळी ओळख होती. या खड्ड्यांत धारदार भाले असायचे. ते शिकारीसाठी वापरत असावा. का कशासाठी हे करायचा, हे सगळे तर्कच. त्याच्या अस्तित्वाच्या असंख्य खुणा आणि प्रश्न मागे ठेवूनच तो निघून गेला.
स्थानिक वृत्तानुसार, 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 मध्ये या परिसरावर सशस्त्र बंदुकधारींनी त्याच्या या भागावर हल्ला केला. त्यात त्याच्या जमातीतील माणसं गेली. या भागात निरीक्षणासाठी गेलेल्या एक महिला अधिकारी म्हणतात, माझ्यासाठी ते फक्त प्रतिकार आणि लवचिकतेचं प्रतीक होता. स्वावलंबी जगणंआणि कुणाशीही संपर्क टाळणं हेच त्याच्या आय़ुष्याचं ब्रीद होतं. कदाचित यामागे काहीतरी गूढ दुःख किंवा दृढनिश्चय हेच कारण असावं…
प्रश्न पडणं आणि उत्तरं शोधण्याचा हव्यास असलेली माणसं आता या मृताच्या शरीराची चिरफाड करतायत.. त्याच्या डीएनएवर संशोधन सुरु आहे. अफाट वेगानं संवाद, संपर्कासाठी माणसानं साधनं निर्माण केली. पण असंख्य झावळ्यांनी झाकलेली त्याची झोपडी दिसतेय, तसाच त्यानं त्याचं आयुष्य बंद ठेवलं. अख्ख्या जगाचा प्रतिकार केला. तो मेला अन् त्याच्या जगण्यावर संशोधन सुरु झालंय…
2018 मध्ये या माणसानं झाड तोडण्याचा व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न सरकारी अधिकाऱ्यांनी केला. मात्र त्यानं एवढ्या गूढ हालचाली केल्या आणि अत्यंत आक्रस्ताळेपणानं हा प्रयत्न हाणून पाडला. आपल्या आयुष्यात क्षणभरही इतरांचा शिरकाव होऊ न देण्याची ही वृत्ती त्यानं अखेरपर्यंत घट्ट कवटाळून ठेवली. एकाकीण हे भयंकर असतं हे आपण म्हणतो, पण त्याच्यासाठी ते हवं हवं होतं का आणखी काही गूढ त्यामागे होतं?