म्यानमार 114 आंदोलकांची हत्या, अंतिम संस्कारावेळीही सैन्याचा गोळीबार

| Updated on: Mar 28, 2021 | 7:12 PM

1 फेब्रुवारीला म्यानमार सैन्याने सत्ता काबिज केल्यानंतर शनिवारी सैन्याने केलेल्या गोळीबारात शेकडो आंदोलकांचा बळी गेला आहे. बागो शहरात झालेल्या गोळीबारात किती लोकांचा मृत्यू झाला याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

म्यानमार 114 आंदोलकांची हत्या, अंतिम संस्कारावेळीही सैन्याचा गोळीबार
म्यानमार सैन्याकडून शेकडो आंदोलकांची हत्या, अंत्यसंस्कारावेळीही गोळीबार
Follow us on

नवी दिल्ली : म्यानमार सैन्याने रविवारी अंत्यसंस्कारात सहभागी लोकांवर गोळीबार केला. हे सर्व लोक सैन्याने केलेल्या मारहाणीत आणि गोळीबारात मृत्यू झालेल्या 114 जणांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. 1 फेब्रुवारीला म्यानमार सैन्याने सत्ता काबिज केल्यानंतर शनिवारी सैन्याने केलेल्या गोळीबारात शेकडो आंदोलकांचा बळी गेला आहे. बागो शहरात झालेल्या गोळीबारात किती लोकांचा मृत्यू झाला याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. हे ठिकाण राजधानी यांगून जवळ आहे.(Myanmar army kills 114 protesters, fires at funerals)

म्यानमार सैन्यानं शनिवारी लढावू विमानातून आंदोलकांवर हवाई हल्ले केले. हे हल्ले थायलंड सीमेजवळील एका गावावर करण्यात आले. या गावात सशस्त्र जातीय समुहाचं नियंत्रण आहे. आता म्यानमारमध्ये गृहयुद्ध सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारेन नॅशनल यूनियन नावाच्या एका संघटनेचं दक्षिण-पूर्व क्षेत्रात नियंत्रण आहे. सैन्याने हा हवाई हल्ला रात्री 8 वाजता केला. या हल्ल्यामुळे गावातील लोकांना पळून जावं लागलं.

सैन्याकडून बॉम्ब वर्षाव

सिव्हिल सोसायटी ग्रुप कारेन पीस सपोर्ट नेटवर्कच्या प्रवक्त्याने सांगितलं की, सैन्याने बॉम्बवर्षाव केलाय. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय. तर दोन लोक जखमी झाले आहे. म्यानमारमधील सर्वात मोठं शहर असलेल्या यांगून आणि मांडलेसह अन्य शहरात विरोधी आंदोलन करण्यात आलं. शनिवारी म्यानमार सैन्याने सर्वात मोठी हिंसक कारवाई केली. त्या कारवाईनंतर आज अनेक ठिकाणी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश

हत्या करण्यात आलेल्या 114 लोकांमध्ये 10 ते 16 वर्षाच्या 6 लहानग्यांचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा निषेध केला जातोय. पाश्चिमात्य देशांनी म्यानमार सैनिकांवर प्रतिबंध लादले आहेत. तसंच निषेधही व्यक्त केलाय. म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीला सैन्यानं सत्ता काबिज केली. तेव्हापासून संपूर्ण देशात तीव्र निदर्शनं सुरु आहेत.

म्यानमारमध्ये नेमकं काय घडलं?

म्यानमारमध्ये 8 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लील फॉर डेमॉक्रसी अर्थात NLD या पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. सू ची यांच्या NLD या पक्षाला 476 पैकी तब्बल 396 जागा मिळाल्या. तर लष्कराने पाठिंबा दिलेल्या युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट या पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निकालानंतर मतदार याद्यांमध्ये मोठी अफरातफर झाल्यानं असा निकाल लागल्याचा दावा म्यानमारच्या लष्करानं केला होता. मात्र, याबाबत कुठलेही पुरावे नसल्याचं सांगत म्यानमारच्या निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळून लावला होता. अशा परिस्थितीत आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचं संसदीय सत्र 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार होतं. लष्कराने पुन्हा एकदा उठाव करुन संसदीय सत्र सुरु होण्यापूर्वीच देशाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत.

संबंधित बातम्या :

म्यानमारमध्ये लष्कराचा उठाव, सत्तापालट; वर्षभरासाठी आणीबाणी

Myanmar Coup : म्यानमार सैन्याची क्रुरता, वाहिले रक्ताचे पाट, आतापर्यंत 320 आंदोलकांची हत्या

Myanmar army kills 114 protesters, fires at funerals