नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा ( NASA ) इंटरनॅशनल स्पेश स्टेशनला ( ISS ) हटविण्याची योजना आखत आहे. या योजनेनूसार या अंतराळ स्थानकाला नष्ट करण्यात येणार आहे. अंतराळ संशोधकांच्या मते हे अंतराळ स्थानक खूपच जुने झाले आहे. पुढे आणखी चांगले संशोधन करण्यासाठी आणखी आधुनिक अंतराळ स्थानकाची गरज आहे. नासाने आता युएस डोरबिट व्हेईकल डेव्हलप करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अंतराळ स्थानकात अनेक देशांचे अंतराळवीर सहा महिने राहून संशोधन करीत असतात.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे वजन सुमारे 4,19,725 किलो आहे. त्यामुळे त्याला नष्ट करणे सोपे नसणार. त्यासाठी नासाने खास योजना जाहीर तयार केली आहे. अंतराळ स्थानकाला अचानक पाडले जाणार नाही. तर त्याला टप्प्याटप्प्याने खाली आणले जाणार आहे. जानेवारी 2031 पर्यंत ते पृथ्वीच्या वातावरणात पोहचेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यानंतर त्याला साऊथ पॅसिफीक समुद्रात पाडले जाणार आहे. त्याच्यामुळे पृथ्वीवर कोणालाही नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जाईल. अंतराळ स्थानक आतापर्यंतचा सर्वात मोठा कृत्रिम उपगृह आहे. हा प्रोजेक्ट साल 1989 मध्ये सुरु करण्यात आला होता.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या मते हे अंतराळ स्थानक पृथ्वीपासून सुमारे 410 किमी उंचीवरुन पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे सोलर पॅनलना अपग्रेड करण्याचे काम अंतराळवीरांच्या एका टीमने स्पेस वॉक करीत केले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाच देशांचा संयुक्त उपक्रम आहे. नासा, युरोपीय स्पेस एजन्सी, जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी, कॅनडा स्पेस एजन्सी आणि रशियाची रोस्कोस्मोस यांनी एकत्रीत येऊन ते तयार केले होते. हे स्पेस स्टेशन साल 2030 पर्यंत चालविण्याची योजना आहे.